Yogi Adityanath Poster In Raja Gyanendra Rally In Nepal: नेपाळचे माजी शासक राजे ज्ञानेंद्र शाह हे पुन्हा एकदा काठमांडूमध्ये परतले असून हजारो लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी काठमांडूच्या रस्त्यावर एकच गर्दी केली. २००८ मध्ये पदच्युत झाल्यानंतर, राजे ज्ञानेंद्र पहिल्यांदाच काठमांडूत परतले आहेत. यावेळी त्यांनी “जर देशाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर पाठिंबा द्या” असे आवाहन केले. दरम्यान राजे ज्ञानेंद्र यांचे स्वागत करणाऱ्या समर्थकांच्या गर्दीत एक वेगळाच चेहरा पाहायला मिळाला. तो चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळच्या अस्थिर राजकारणात, आदित्यनाथ यांचे पोस्टर आश्चर्यकारक होते. भाजपा नेते हे नेपाळच्या पदच्युत राजेशाहीचे समर्थक म्हणून ओळखले जातात आणि भ्रष्टाचाराच्या आरोप होत असलेले के पी शर्मा ओली सरकारसमोर ज्ञानेंद्र यांच्या काठमांडूतील रॅलीतून त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

ओली यांच्या समर्थकांनी आदित्यनाथ यांचे पोस्टर म्हणजे राजे ज्ञानेंद्र यांच्यामागे भारताचा हात असल्याचे म्हटेले आहे. याचबरोबर राजे ज्ञानेंद्र यांच्या रविवारच्या रॅलीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे राजे ज्ञानेंद्र समर्थक पक्षांनी आदित्यनाथ यांचे पोस्टर मुद्दाम पेरले असल्याचा आरोप केला असून, हा ओली सरकारने रचलेला कट असल्याचे म्हटले आहे. रॅलीच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यनाथ यांच्या फोटोचा वापर करण्यास अधिकृत मान्यता नव्हती किंवा त्यांना त्याबद्दल माहितीही नव्हती, रॅलीत सहभागी होणाऱ्यांना फक्त राष्ट्रध्वज आणि ज्ञानेंद्र यांचे फोटो वापरण्याची सूचना देण्यात आली होती.

“आम्ही आमच्या रॅलीत परदेशी व्यक्तीचा फोटो वापरण्याइतके कमकुवत नाही,” असे माजी मंत्री आणि राजेशाही समर्थक दीपक ज्ञवाली म्हणाले. पक्ष कार्यालयांमध्ये मार्क्स, लेनिन, माओ इत्यादींचे फोटो लावणाऱ्या कम्युनिस्टांबद्दल काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

नेपाळच्या राजघराण्याचे आणि आदित्यनाथ सध्या प्रमुख आहेत त्या गोरखनाथ मठाचे संबंध खूप जुने आहेत. ज्ञानेंद्र यांच्या रॅलीचे मुख्य आयोजक असलेले राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र लिंगदेन यांनी याकडे लक्ष वेधले आणि म्हटले, “आम्हाला त्याबद्दल (आदित्यनाथ यांचे पोस्टर) माहिती नाही. परंतु राजे ज्ञानेंद्र यांचा गोरखनाथ मठावर विश्वास आणि आदर आहे, कारण शाह राजवंशाला गुरु गोरखनाथांचा आशीर्वाद मिळाला होता असे मानले जाते.”

गोरखनाथ हे शाह राजवंशाचे प्रमुख देव आहेत आणि नेपाळमध्ये राजेशाही असतानाही ते होते. गोरखनाथ मठ प्रमुखांनी नेपाळमधील मठ आणि देवस्थानांना बराच वेळा भेट दिली आहे.

नेपाळची राजेशाही बरखास्त

भारतातील यूपीए सरकारने (२००४-२०१४) ने नेपाळमधील आठ राजकीय पक्षांच्या नेत्यांना, ज्यात माओवाद्यांचा (त्यावेळी बंडखोरीचे नेतृत्व करणारे) समावेश होता, एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले ज्यामुळे नेपाळची राजेशाही बरखास्त झाली आणि नंतर त्याचे पतन झाले. यामुळे माओवाद्यांना “जगातील एकमेव हिंदू राज्य” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला.

त्यावेळी गोरखपूरचे खासदार आणि गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ यांनी या काराराचा जोरदार विरोध केला होता.

राजे ज्ञानेंद्र-योगी आदित्यनाथ यांची भेट

काठमांडूच्या रॅलीपूर्वी विविध तीर्थक्षेत्रांना भेट देणारे राजे ज्ञानेंद्र यांनी गेल्या महिन्यात लखनऊ आणि गोरखपूर येथे आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, राजे ज्ञानेंद्र आणि आदित्यनाथ यांच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये. “राजकीय पद भूषवणे आणि धार्मिक मठाचे प्रमुखपद भूषवणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे महाराजांना माहिती आहे आणि त्यांचा आदर आहे. म्हणूनच, राष्ट्रीय सलोख्याचे आवाहन करण्यापूर्वी त्यांनी गोरखपूरला भेट दिली,” असे सहकाऱ्याने सांगितले.