Yogi Adityanath : संभलच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं आहे. तसंच ते म्हणाले आहेत की भगवा रंग ही माझी ओळख आहे. सनातन धर्माची ओळक आहे आणि मला याचा अभिमान आहे, गर्व आहे. कुणाच्याही श्रद्धेवर कब्जा करणं गैर आहे असंही मत योगी आदित्यनाथ यांनी मांडलं. लखनऊ येथील एका मीडियाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे भाष्य केलं.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
आपल्या देशात करोनासारखं संकट आलं होतं, जग थांबलं होतं पण आपण चालत होतं. मी आज हे सांगू इच्छितो की भगवा रंग ही माझी ओळख आहे. मला त्याचा गौरव आणि अभिमान आहे. तसंच मी हेदेखील सांगू इच्छितो की १५२६ मध्ये संभल येथील श्रीहरि विष्णू मंदिर तोडण्यात आलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १५२८ मध्ये रामाचं मंदिर तोडण्यात आलं. हे वास्तव आहे, तसंच संभल या ठिकाणी ६८ तीर्थक्षेत्रं होती आम्ही आमच्या सरकारने त्यातील १८ शोधली आहेत. १९ स्तूप होते. ते सगळे आम्ही शोधले आहेत. ५६ वर्षांनी हिंदूंच्या शिव मंदिरात पूजा झाली. इतके दिवस फक्त जातीच्या नावावर लोकांना वाटण्याचंच काम या लोकांनी (काँग्रेस) केलं.
संभलचा उल्लेख पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे-योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कुठल्याही माणसाच्या श्रद्धेवर जबरदस्तीने घाला घालू शकत नाही. ते स्वीकारार्ह नाही. संभल हे एक वास्तव आहे, संभलचा उल्लेख ५ हजार वर्षांपूर्वीच्या पुराणांमध्ये आहे. विष्णूच्या दशावतरांचा उल्लेख आहे. इस्लामचा उदय होऊन १४०० वर्षे झाली आहेत. मी तुम्हाला ५ हजार वर्षांपूर्वीची बाब सांगितली. असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
औरंगजेबाला कुणी आदर्श आणि नायक मानत असेल तर तो माणूस विकृत-योगी आदित्यनाथ
औरंगजेबाला कुणी आदर्श किंवा नायक मानत असेल तर तो माणूस विकृत आहे. मानसिक दृष्ट्या खचलेला आहे असं मला वाटतं. कुठल्याही बुद्धिमान माणसाला औरंगजेब हा आदर्श वाटणारच नाही. मला सांगा कुठल्यातरी सभ्य मुस्लिम माणसाने आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवलं आहे का? कारण औरगंजेबाने त्याचे वडील शहाजहाँ यांनाच कैद केलं होतं. पाण्याचा एक एक थेंब प्यायला मिळावा म्हणून तडफडवलं होतं. हे आम्ही सांगत नाही शहाजहाँ ने हे लिहून ठेवलंय. असा मुलगा कुणालाही व्हायला नको. या औरंगजेबापेक्षा तो हिंदू चांगला आहे जो मृत्यूपश्चात त्याच्या पितरांनाही तर्पणाच्या रुपाने पाणी देतो. कुठलाही माणूस औरंगजेब हे नाव ठेवत नाही. तसंच भारताची श्रद्धा ज्या काशी विश्वनाथावर आहे. औरंगजेबाने हे मंदिर तोडलं होतं. मथुरेत श्रीकृष्णाचं मंदिर औरंगजेबानेच तोडलं होतं. हजारो मंदिरं फोडली. त्यामुळे औरंगजेबचा उल्लेख आदर्श म्हणून कुणी करत असेल तर मानसिक विकृतीच्या माणसाने उत्तर प्रदेशात यावं आम्ही त्याचा आजार बरा करु असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.