आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाकडून योजना आखली जात असून या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. केंद्रात सत्ता हवी असेल तर उत्तर प्रदेश या राज्यात चांगली कामगिरी करणे फार गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपाने येथे जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत भाजपाचे नेते महिनाभर राज्यांत बैठकांच्या माध्यमातून मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. याची सुरुवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यांनी गोरखपूर येथे ‘टीफीन पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करत भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच आगामी महिन्याभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेमके काय करावे? याबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा >>> Loksabha Election 2024 : राहुल गांधींमुळे विरोधकांची ऐक्यावरील चर्चा लांबणीवर, आता २३ जून रोजी होणार बैठक!
भाजपाकडून ‘टीफीन पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन
भाजपाच्या महासंपर्क अभियानांतर्गत उत्तर प्रदेश भाजपाने रविवारी गोरखपूर येथे ‘टीफीन पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी त्यांनी स्वत: आणलेल्या टीफीनमध्ये जेवण करत भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा पक्षाला नवी ओळख मिळणे गरजेचे आहे. हा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही. या पक्षात हुकूमशाही, घराणेशाही चालत नाही, हे लोकांना पटवून सांगावे, असे आवाहन आदित्यनाथ यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.
पक्षाची वेगळी प्रतिमा निर्माण होणे गरजेचे- योगी आदित्यनाथ
“देशातील पारंपरिक पक्षांत घराणेशाही चालते. त्या पक्षांची जातीवादी मानसिकता आहे. मात्र भाजपामध्ये असे काहीही नाही. भाजपा पक्षाला वेगळी ओळख मिळणे गरजेचे आहे. भाजपा पक्ष फक्त एक व्यक्ती चालवत नाही. भाजपा पक्ष हा सामान्य लोकांचा पक्ष आहे, हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे,” असे योगी आदित्यनाथ ‘टीफीन पे चर्चा’ कार्यक्रमाला आलेल्या भाजपाच्या ३२८ कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले.
हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रचारात भाजपाने काँग्रेसपेक्षा दुप्पट खर्च केला; गुजरातचा खर्च मात्र गुलदस्त्यात
‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे धर्तीवर ‘टीफीन पे चर्चा’
टीफीन पे चर्चा हा कार्यक्रम उत्तर प्रदेशमधील सर्वच म्हणजेच ४०३ विधानसभा मतदारसंघांत राबवला जाणार आहे. या मोहिमेतील पहिला कार्यक्रम हा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे होणार होता. या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित राहणार होते. मात्र ओदिशा येथे रेल्वे अपघात झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये टीफीन पे चर्चा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते तथा कार्यकर्त्यांना घरूनच टीफीन आणायला सांगितले जात आहे. तसेच जेवणादरम्यान पक्षबांधणी तसेच पक्षवाढीवर चर्चा केली जाणार आहे.
भाजपा पक्ष महापुरुषांचा आदर करतो- योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी टीफीन पे चर्चा कार्यक्रमात नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला. यासह ही कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवीत, असेही त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. “नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज भाजपा पक्ष नवी शिखरं गाठत आहे. सध्या हा पक्ष देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. भाजपा पक्ष भारतातील महापुरुषांचा आदर करतो तसेच हा पक्ष भारताची मूल्ये जोपासतो,” असे आदित्यनाथ म्हणाले.
घुसखोरी करण्याची कोणाचाही हिंमत नाही- योगी आदित्यनाथ
आदित्यनाथ यांनी मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचाही उल्लेख केला. “आज भारताच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. भारतामध्ये घुसखोरी करण्याची आज कोणाचीही हिंमत नाही. मोदी यांच्या नेतृत्वात आज देश आपला अभिमान आणि सन्मान जपण्याचे शिकला आहे,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा >>> कर्नाटक सरकार गाईंच्या कत्तलीला परवानगी देणार? भाजपा आक्रमक; सिद्धरामय्या म्हणतात, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू
देशातील नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आला- योगी आदित्यनाथ
भाजपाची सत्ता येण्यापूर्वी देशातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्याने गंभीर स्वरुप धारण केले होते, असा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला. “काश्मीरमध्ये अगोदर कट्टरतावादाने टोक गाठले होते. इशान्येकडील राज्यांत फुटीरतावादाला बळ मिळालेले होते. साधारण १२ ते १५ राज्यांत नक्षलवाद फोफावला होता. आज मोदी सरकारने कलम ३७० रद्दबातल ठरवलेले आहे. आता काश्मीरमध्ये शांतता आहे. पंचायत निवडणुकीत तेथील जनतेने मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आज लोक भाजपाला पाठिंबा देत आहेत. मागील ९ वर्षांत विकास झाल्यामुळेच आज जम्मू काश्मीरचा चेहरामोहरा बदलला आहे. देशातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलेला आहे,” असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.
“सध्या अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, आसाम या इशान्येकडील राज्यांत भाजपाची सत्ता आहे. नागालँड आणि मेघालयमध्येही भाजपा सत्तेस सहभागी आहे,” असेही आदित्यनाथ म्हणाले. यासह आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या भागातील प्रगती आणि विकासावर भाष्य केले. गोरखपूरमधील विकासकामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील या टीफीन पे चर्चा या मोहिमेला किती यश येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.