तेलंगणात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबर रोजी या राज्यात मतदान होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात जाऊन प्रचार केला आहे. प्रचारादरम्यान आम्ही निवडून आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर असे करण्यात येईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबाद शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन का देण्यात आले? भाजपाने तेलंगणात हे नाव बदलण्याचे धोरण लावून का धरले? असे अनेक प्रश्न विचारले जातायत.
२०२० साली हैदराबादचा भाग्यनगर असा उल्लेख
याआधीही भाजपाने हैदराबाद शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिलेले आहे. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान योगी आदित्यनाथ तसेच तेलंगणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनीही हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या शहराचे नाव बदलण्याच्या धोरणाची नव्याने चर्चा होत आहे. २०२० साली हैदराबादमध्ये महापालिका निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक जिंकण्यासाठीदेखील भाजपाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला होता. त्या निवडणुकीसाठीही योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये प्रचारासाठी गेले होते. प्रचारादरम्यान त्यांनी आम्ही सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू, असे आश्वासन दिले होते. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेनंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी हैदराबादचे नाव बदलण्यात येईल असे सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हैदराबादचा अनेकवेळा भाग्यनगर असा उल्लेख केलेला आहे.
नाव बदलण्यामागचे राजकारण
भाजपाने आतापर्यंत अनेक शहरांची, स्थळांची नावे बदललेली आहेत. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तर या राज्यात अनेक शहरांची नावे बदलली आहेत. मुघलसराय रेल्वेस्थानकाचे नाव दीन दयाल उपाध्याय करण्यात आले आहे. अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यात आले आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी लखनौ शहराचे नाव हे लक्ष्मण नगरी करण्यात येईल, असे सांगितलेले आहे. महाराष्ट्रातही औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आले आहे. भाजपा हा हिंदूत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. नाव बदलण्याच्या भूमिकेमुळे हिंदू मते आपल्याला मिळतील असे भाजपाला वाटते.
हैदराबादमधील भाग्यलक्ष्मी मंदिर
भाजपाला तेलंगणा राज्यात आपले पाय रोवायचे आहेत. त्यामुळे या राज्यात भाजपा आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला प्राधान्य देत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून २०२१ साली तेलंगणा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी २०२१ साली प्रजा संग्राम यात्रा आयोजित केली होती. या यात्रेची सुरुवात हैदराबादमधील भाग्यलक्ष्मी मंदिरापासून करण्यात आली होती. हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारच्या बाजूलाच हे मंदिर आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी अशा मोठ्या नेत्यांनीदेखील या मंदिराला भेट दिलेली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने हे मंदिर चारमिनारच्या एका भिंतीला लागून आहे, त्यामुळे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जागा नाही, असे सांगितले होते. तेव्हा या मंदिराची चांगलीच चर्चा झाली होती.
ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
भाजपा तेलंगणा राज्यात आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे. या राज्यात साधारण ५२ टक्के जनता ओबीसी प्रवर्गात मोडते. याच मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. या राज्यात साधारण १३ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. बहुतांश मुस्लीम मतदार हैदराबाद, निझामाबाद, कामारेड्डी, महबूबनगर या भागांत आहेत. त्यामुळे या भागातही विस्तार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
बीआरएस, एमआयएमची भूमिका काय?
बीआरएस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी मात्र भाजपाच्या या राजकीय धोरणावर टीका केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी यापूर्वी हैदराबाद शहराचे नाव बदलून भाग्यनगर असे करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर आयटी मंत्री के. टी. रामाराव (केटीआर) यांनी प्रतिक्रिया दिली होती. हैदराबादचे नाव बदलण्याआधी त्यांनी अहमदाबादचे नाव अदाणीबाद करावे, असे म्हटले होते. मोदी सरकारकडून अदाणी उद्योग समूहाला पूरक अशी भूमिका घेतली जाते, असा आरोप केला जातो. याच आरोपाच्या संदर्भाने अहमदाबादचे नाव अदाणीबाद करावे, अशी टीका रामाराव यांनी केली होती.
असदुद्दीन ओवैसी यांची टीका
तर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील भाजपाच्या या धोरणावर टीका केली आहे. “सर्वांत अगोदर भाग्यनगर हे नाव कोठून आले, हे त्यांना विचारायला हवे. या नावाचा उल्लेख नेमका कोठे आहे. ते हैदराबाद नावाचा तिरस्कार करतात, म्हणूनच ते बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे. हैदराबाद हे नाव आमची ओळख आहे. आमच्या ओळखीला तुम्ही दुसरे नाव कसे देणार. ते फक्त द्वेषाचे राजकारण करत आहेत”, असे ओवैसी म्हणाले. हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन हे भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतीक आहे, असे म्हणत हैदराबाद आणि तेलंगणातील जनता भाजपाला योग्य ते उत्तर देईल, अशी आशाही ओवैसी यांनी व्यक्त केली.