फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे मंगळवारी (२७ जून) एका आफ्रिकन किशोरवयीन मुलाची वाहतूक पोलिसांनी हत्या केली. या घटनेनंतर चार दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत. जागोजागी जाळपोळ, लुटमार आणि पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. फ्रान्सची परिस्थिती हाताळण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचेसारखे नेतृत्व हवे, अशा आशयाचे ट्विट योगी आदित्यनाथ कार्यालय या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे. एल. जॉन काम या ट्विटर हँडलवरून योगी आदित्यनाथ यांना फ्रान्सला पाठविण्याची मागणी केली. या ट्वीटला उत्तर देत असताना योगी आदित्यनाथ यांच्या हँडलवरून म्हटले, “जगाच्या कोणत्याही भागात जेव्हा जेव्हा अतिरेकी गटाकडून दंगली होतात, अराजकता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेव्हा उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिवर्तनकारी ‘योगी मॉडेल’ची आठवण काढली जाते”
या ट्वीटनंतर भाजपाचे उत्तर प्रदेशचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला. या व्हिडिओत ते म्हणतात, “असा एक काळ होता, जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये दंगलसदृश्य परिस्थितीचे सावट असायचे, प्रत्येक जिल्ह्यात कर्फ्यू लागलेला असायचा. पण जेव्हापासून उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून दंगलखोरांना अद्दल घडविण्यास सुरुवात झाली. त्यांची घरे बुलडोजरने जमीनदोस्त करण्यात आली आणि यूपीमधील दंगली कायमच्या थांबल्या. या कामगिरीचा प्रतिध्वनी आता फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून ऐकायला येत आहे. त्यामुळेच फ्रान्ससारख्या देशातून योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे, तसेच तेथील दंगली थांबविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व असावे, अशी मागणी होत आहे. एकप्रकारे उत्तर प्रदेशच्या चोख कायदा व सुव्यवस्थेवर जागतिक मोहोर उमटल्याचे यातून दिसत आहे.”
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही फ्रान्सच्या दंगलीवर भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फ्रान्समधील ८५० वर्षांपूर्वीचे सर्वात जुने ग्रंथालय जाळल्याची बातमी पाहून आम्हाला भारतात इसवी सन ११९९ व्या शतकात तुर्कीचा शासक बख्तियार खिलजीने उध्वस्त केलेल्या नालंदा विद्यापीठाची आठवण झाली.
काँग्रेसचे नेते एके अँटनी यांचे सुपुत्र आणि भाजपवासी झालेल्या अनिल के अँटनी यांनीही फ्रान्सच्या दंगलीच्या निमित्ताने भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, नागरिकत्व सुधारणा विधेयक #CAA मसुदा तयार करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दबावापुढे न झुकण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाचा प्रयत्न केला. भारताच्या शेजारी असलेल्या तीन राष्ट्रांमधील धार्मिक अल्पसंख्याकांना मदत मिळवून देण्याचा आमचा हेतू होता. अन्यथा घुसखोरांना प्रवेश मिळवून देऊन त्याचा स्वार्थासाठी उपयोग करण्यात आला असता.
प्राध्यापक एल. जॉन काम या ट्विटर हँडलवरून सर्वात पहिल्यांदा ट्वीट करून योगी आदित्यनाथ यांच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ते युरोपियन डॉक्टर असल्याचे सांगितले गेले, मात्र हा दावा खोटा असल्याचे आता समोर आले आहे.