भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी एका मुलाखतीत बोलताना UPPET परीक्षेतील गोंधळावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय विविध प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी भाजपावरही टीका केली आहे.
मागील आठवड्यात UPPET परीक्षेसाठी झालेली प्रचंड गर्दी ही रोजगाराच्या टंचाईइतकीच राज्य सरकारच्या गलथान कारभाराची द्योतक होती, तुम्ही याकडे कसे पाहता? या प्रश्नावर आझाद म्हणाले, “भारतात आता लोकशाही नाही. कारण लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य आहे. आता लोकशाहीसारखी दिसणारी राजेशाही आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष नोकऱ्यांची मोठमोठाली आश्वासनं देताना आपण पाहतो. काहीजण तर दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याचंही सांगतात. तुम्ही पाहिलं असेल की या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी सरकारने लोकांना रेशन देण्यास सुरुवात केली. ही मतांसाठी एकप्रकारे लाच आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष खोटं बोलतात. यामुळे युवकही त्रस्त आहेत. ते अभ्यास करतात आणि सरकारी नोकरीची आशा करतात. बेरोजगारीची स्थिती इतकी गंभीर आहे की, चतुर्थ श्रेणीच्या नोकरीच्या दहा रिक्त जागांसाठी पाच लाख जण अर्ज करतात. पाच लाखांपैकी दोन लाखच योग्य असतात. देशाच्या क्षमतांचाही आपण नीट वापर करत नाही.”
याशिवाय “यूपीईटी परीक्षेच्या वेळी झालेला गैरप्रकार आपण पाहिला आहे. मी टीकेवर विश्वास करत नाही, मात्र प्रत्येकजण म्हणत होता की धार्मिक कार्यक्रम असेल तर उमेदवारांवर फुलांच्या पाकळ्यांचाय वर्षाव झाला असता. माझं मत आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हानांचे भान असायला हवे होते. धार्मिक कार्यक्रम आणि निवडणुकांच्यावेळी नवी रेल्वे चालवल्या जातात. मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही राज्याचे रक्षक आहात आणि विद्यार्थ्यांचा सुरक्षितरित्या कसा प्रवास होईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे होती.” असंही आझाद यांनी सांगितले.
तर या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना आझाद म्हणाले की, “ते(योगी आदित्यनाथ) माता-भगिनींच्या सुरक्षेबाबत नेहमी बोलत असतात. आता त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावं की, तुम्ही तुमच्या घरात बसून धार्मिकविधी करावेत यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही. तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवले आहे. जर जमत नसेल तर राजीनामा द्या.”
तसेच भाजपा आणि आम आदमी पार्टीवरही त्यांनी टीका केली आहे. “जर मी एखाद्या देवतेला माझा देव मानत नाही, तर हा अनादर नाही. जर मी एखाद्या देवतेविरोधात काही बोललो तर तो अनादर होईल… दिल्लीचे मंत्री गौतम यांच्याविरोधात कोणी तक्रार केली? भाजपा. त्यांना राजीनामा देण्यास कोणी मजबूर केलं? आम आदमी पार्टी. दोन्ही पक्ष केवळ मतं मिळवण्यासाठी आंबेडकरांच्या नावाचा वापर करत आहेत.” असंही चंद्रशेखर यावेळी म्हणाले आहेत.