सुहास सरदेशमुख
औरंगाबाद: ‘आवाज कुणाचा…..’ अशी जोरदार घोषणा झाली की त्याला साद मिळायची ‘शिवसेनेचा’ अशी . त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक घोषणा होते -‘नारा ए तकबीर… आणि प्रतिसाद येतो अल्लाह हु अकबर’. औरंगाबादच्या राजकीय पटलावरील ध्रुवीकरणाचा खेळ एवढे दिवस याच पातळीवरचा. या खेळात एकदा विधानसभेत आणि एकदा लोकसभेत जेव्हा दुपदरी दुभंग झाला तेव्हा विजयी ठरलेले नाव म्हणजे इम्तियाज जलील. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ उत्तम भाषणातून मुस्लिम समाजाचे संघटन घडविणारा नेता अशी खासदार जलील यांची ओळख. पण ही ओळख तशी अपुरी. आरोग्याचा प्रश्न असो किंवा व्यसनाधिनतेचा, तो प्रश्न मूळातून सुटावा यासाठी सर्व ताकदीने प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारा अशीही त्यांची ओळख औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ४४९२ मतांनी विजय मिळविला. केवळ १५ दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय तेव्हा यश देऊन गेला. मराठा- मराठेत्तर विभाजनात हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये झालेले विभाजन आणि जलील खासदार झाले. तत्पूर्वी औरंगाबाद मध्य मतदारसंघातही ते आमदार म्हणून निवडून आले तेव्हाही प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांच्यामध्ये असाच दुपदरी दूभंग होताच. त्यामुळे ध्रुवीकरणातील नेता अशी इम्तियाज जलील यांची ओळख. पण या राजकीय पटलावरील ओळखी पलिकडे आपल्या उर्दू, आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे खासदार जलील जेव्हा मुद्दा उचलतात तेव्हा त्याकडे काेणालाही दुर्लक्ष करता येत नाही.
हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता
औरंगाबाद शहरातील आरोग्याच्या क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अनेक बैठका घेतल्या. प्रशासकीय पातळीवर आणि सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसताच त्यांनी न्यायालयात आरोग्य विभागातील वरिष्ठांना प्रतिवादी करत न्यायालयात प्रकरण नेले. केवळ प्रकरण दाखल केले नाही तर उच्च न्यायालयात आपल्या मुद्द्यांसाठी त्यांनी केलेले युक्तीवाद न्यायालयीन कामकाजातही चर्चेत आहेत.
हेही वाचा: रविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता
गर्दीला नियंत्रित करण्याची कमालीच हुकुमत असणारे इम्तियाज जलील हे ५४ वर्षाचे. पत्रकारिता आणि विपणन क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर मजलीस- ए- इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेत ते अचानकच आले. आपल्या भाषा प्रभुत्वामुळे त्यांनी आधी मुस्लिम समाज मनात जागा निर्माण केली. आता धर्माबाहेरही आपला चाहता वर्ग निर्माण व्हावा असे ते प्रयत्न करतात. विकास प्रश्नी खासदार म्हणून ते एखाद्या बैठकीत प्रश्न उपस्थित करतात तेव्हा अधिकाऱ्यांना घाम फुटतो. त्यामुळेच महापालिकेच्या घरकुल याेजनेसाठी त्यांनी उठविलेला आवाज सत्ताधाऱ्यांनाही ऐकावा लागला. राजकारणातील बातम्या लिहिणारा, संपादन करणारा आता बातम्या घडवून जातो आहे. पण हे सारे करताना ध्रुवीकरणाच्या टोकावर उभे राहणारा अशी खासदार जलील यांची ओळख पुढील पिढीपर्यंत कायम राहील, असाच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा पट आहे.