अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य, शैक्षणिक सुविधा आणि रोजगार उपलब्ध नसल्याने तरुण शहरांची वाट धरतात. मात्र अमित सीताराम सामंत या तरुणाने महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ध्येय ठेवून काम केले. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. कुडाळ येथील अमित सामंत यांनी सन १९९१ मध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे काम सुरू केले. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य युवक उपाध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाली. या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध विषयांवर त्यांनी नेहमीच काम सुरू ठेवले.
शैक्षणिक संस्था स्थापन करून जिल्ह्यातील तरुणांना शैक्षणिक दालन सुरू केले. त्यामुळे या माध्यमाच्या शिक्षणासाठी तरुणांना मुंबई किंवा मोठ्या शहरांकडे जावे लागत होते ते थांबवण्यात त्यांना थोडेफार यश आले. त्याचबरोबर ध्येय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले.
त्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय सेक्रेटरी नियुक्ती झाली. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला. दरवर्षी तेरेखोल नदीला पूर आल्यानंतर बांदा शहर व परिसरात पाणी घुसते लोक, व्यापारी, व्यावसायिकांच्या साधन सामग्रीचे नुकसान होते.
हेही वाचा: विक्रांत गोजमगुंडे : ध्येयनिष्ठ, कार्यप्रवण
मात्र अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा इशारा देणारी यंत्रणा बसवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केल्यानंतर सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर्वकल्पना देणारी सायरनसारखी यंत्रणा बांदा पोलीस ठाण्याला सुपूर्द केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्याकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. करोनाकाळात पंधरा दिवसात शंभर खाटांचे रुग्णालय निर्माण झाले. म्हाडाने त्यासाठी साधनसामुग्री दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आश्वासक चेहरा म्हणून सामंत ओळखले जातात.