प्रकाश टाकळकर
अकोले: कपाळावर उभे गंध, अंगावर भगवी शाल अशा वेशात भाजपमध्ये असताना आक्रमक हिंदुत्वाची भाषा करणारे डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार झाल्यानंतर तीच वेशभूषा कायम ठेवली असली तरी आदिवासी अस्मितेला नव्याने धार दिली आहे. जनसंपर्क, मेहनती स्वभाव, स्वच्छ प्रतिमा आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सातत्याने असलेला विरोध. या वैशिष्ट्यांच्या आधारावर आता त्यांचे नेतृत्व पक्षातही प्रस्थापित होत आहे.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेली निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्मितेचा विषय बनली होती. या अस्मितेच्या आधारावर डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या पुत्राचा पराभव करत ते ‘जायंट किलर’ ठरले. नंतर अकोल्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची ३० वर्षांची सत्ताही संपुष्टात आणली. त्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड घट्ट झाली आहे. ४८ वर्षांचे लहामटे यांचा जन्म अकोल्याच्या आदिवासी कुटुंबातील. वडील शिक्षक आणि आई गृहिणी. परंतु नंतर वडील जिल्हा परिषद सदस्य झाले, नंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून मधुकर पिचड यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली होती. एका अर्थाने वडिलांच्या पराभवाचे उट्टे मुलाने काढले असेच म्हणावे लागेल.
हेही वाचा : शिवराज मोरे : विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
लहामटे यांनी आदिवासी गावातील शाळांमध्ये प्रसंगी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नगरच्या पंचानन गुणे आयुर्वेद महाविद्यालयातून ते ‘बीएएमएस’ झाले. महाविद्यालयात असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढा देत विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी, एनएसएस प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. तशा अर्थाने महाविद्यालयीन जीवनातच आमदारकीची बीजे रुजली असे ते स्वतः सांगतात.
नंतर त्यांनी राजूर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. आपल्या काही डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम सुरू केला. सह्याद्री क्रांती दल स्थापन करून त्यामार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी सुरू केले. या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. सामुदायिक विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. लहामटे यांचा विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातच झाला आहे.
आदिवासींचे प्राबल्य असलेल्या राजूर गटात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत ते भाजपाचे तालुक्यातील पहिले जिल्हा परिषद सदस्य बनले. नंतर २०१७ मध्ये पिचड यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातेवाडी जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य घेत निवडून आले. त्याच वेळी त्यांनी ‘आता लक्ष विधानसभा’ ही घोषणा केली होती.
हेही वाचा : देवराव भोंगळे : अभ्यासू व्यक्तिमत्त्व
जनसंपर्क वाढवताना छोट्या-मोठ्या धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत. दखल घ्या किंवा घेऊ नका. मान द्या किंवा देऊ नका. कोणी निंदा कोणी वंदा असे धोरण राबवत त्यांनी अनेक वेळा मतदारसंघ पिंजून काढला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बाळेश्वर ते कळसुबाई अशी ‘जनसंवाद यात्रा’ही त्यांनी काही वर्षे काढली. या यात्रेत हातात पक्षाच्या ध्वजाऐवजी तिरंगा ध्वज असे. या संपर्काचा त्यांना निवडणुकीसाठी मोठा फायदा झाला.याच काळात त्यांनी आदिवासींमधील घुसखोरीच्या मुद्द्यांवरून पिचड यांना टीकेचे लक्ष बनवले. त्या विरोधात आंदोलन उभे करत समाजमाध्यमांचा आधार घेत आदिवासींमध्ये पिचडांच्या नेतृत्वाविरोधात जनतेत रोष निर्माण करण्यात यशस्वी झाले. आमदार झाल्यानंतरही त्यांच्या काम करण्याच्या आक्रमक शैलीत बदल झाला नाही. आजही ते सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होत असतात. आमदार झाल्यानंतर दवाखाना बंद केला आणि त्याच ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. लहान मोठा कोणताही कार्यक्रम ते चुकवत नाहीत. काम करताना प्रशासनाच्या अडचणी समजून घेण्यावर त्यांचा भर असतो.
हेही वाचा : अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता
डॉ. लहामटे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे. त्यांचे वक्तृत्व प्रभावी व आक्रमक आहे. बोलताना परिणामांची पर्वा ते कधीच करीत नाहीत. विधानसभेत आदिवासींच्या प्रश्नावर आवाज उठवत, तालुक्याबाहेरील आदिवासी मेळाव्यातून वाढता सहभाग यातून आपले कार्यक्षेत्र त्यांनी वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. संधी मिळाल्यास राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.
पिचड यांचे अकोले तालुक्यातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणल्यामुळे पक्ष संघटनेतही त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आमदार झाल्यानंतर तालुक्यात अडीच वर्षात ५०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावल्याचा त्यांचा दावा आहे.