चंद्रशेखर बोबडे
नागपूर-राजकारणाचा सध्याचा बाज लक्षात घेता उच्चशिक्षित, दूरदृष्टी बाळगून काही तरी वेगळे करण्याची उमेद असणारे युवक राजकारणापासून अंतर राखून असतात. म्हणूनच सर्व राजकीय पक्ष अशा तरुणांना राजकारणात येण्याचे नेहमी आवाहन करीत असतात. नागपुरातील नितीन रोंघे हे अशाच प्रकारचे उच्चशिक्षित, दूरदृष्टी आणि विदर्भासाठी काहीतरी करण्याची धडपड असणारे तरुण नेतृत्व. संस्थात्मक कार्य, भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर स्वतंत्र विदर्भ चळवळीतील सहभाग हा त्यांचा सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रवास. २००४ पासून स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीत सक्रिय आहेत. महाविदर्भ जनजागरण या संघटनेचे ते संयोजक आहेत. शिक्षित व्हा, त्यानंतर स्वत:साठी अर्थार्जनाचे नियोजन करा आणि मग राजकारणात या, असा सल्ला ते राजकारणात येणाऱ्या युवकांना देतात. नितीन रोंघे यांनी याच मार्गाने राजकारणात पाऊल टाकले. स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे, याची नेमकी कारणे त्यांच्याकडे आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि इतर प्रश्नांसंबंधी केलेल्या कामाची दखल घेत अमेरिकन सरकारने रोंघे यांची २०१२ मध्ये ‘ईमर्जिंग लीडर्स’ म्हणून ‘अमेरिकन लेजिस्लेटिव्ह फेलोशिप प्रोग्राम’साठी निवड केली.
हेही वाचा >>> राज्यसभेत उपराष्ट्रपती धनखड आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी
जगभरातून यासाठी २७ तरुणांची निवड केली जाते. त्यानंतर २०१६ मध्ये अमेरिकन सरकारने तेथील राष्ट्राध्यक्ष निवडणूक निरीक्षणासाठी निमंत्रित केलेल्या १५८ देशांतील प्रतिनिधीमध्ये रोंघे यांचा समावेश होता. त्यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात त्यांनी निवडणूकही लढवली. नितीन रोंघे यांनी बीई (इलेक्ट्रिकल), एमबीएपर्यंत शिक्षण घेतले. रोजगार शोधत असताना विदर्भात उच्चशिक्षित तरुणांसाठी संधीचा अभाव असल्याची बाब प्रथम नितीन रोंघे यांच्या लक्षात आली. नोकरीच्या गरजेतून त्यांनी पुणे गाठले. चांगल्या कंपनीत नोकरी करीत असताना व्यवस्थापकपदापर्यंत पोहोचले. या दरम्यान त्यांना पुण्यात नोकरीसाठी विदर्भातून आलेल्या इतर शिक्षित युवकांच्या जगण्याने व्यथित केले. अनेकांचे ध्येय हे त्यांनी घेतलेल्या फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते फेडणे यापुरतीच मर्यादित असल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा चाचपणी
विदर्भात रोजगार संधी मिळाली असती तर हे तरुण पुण्यात आले नसते, असे त्यांना कायम वाटते. यातूनच त्यांनी विदर्भात परत जाण्याच्या, तेथे काहीतरी करण्याच्या निश्चय केला. २००४ मध्ये पुणे सोडले. नागपुरात आल्यावर नवीन कंपनी सुरू केली. याच दरम्यान विदर्भात सुरू असलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीने त्यांना आकृष्ट केले. या चळवळीचे तत्कालीन नेते मामा किंमतकर, काँग्रेस नेते रणजित देशमुख या नेत्यांच्या भेटीने त्यांचा विदर्भाच्या चळवळीतील सहभाग वाढला आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायलाही मिळाल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःला या चळवळीत झोकून दिले. नुसतेच आंदोलन नव्हे तर जनजागृतीवर भर दिला. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी त्यांनी विदर्भातील आमदारांसाठी ‘विदर्भाचे प्रश्न’ ही पुस्तिका काढली. विदर्भ राज्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण या संघटनेकडे शिक्षित युवकांचा ओघ वाढावा यासाठी शिक्षित नेतृत्वाची गरज भासते. या पार्श्वभूमीवर रोंघे याचे नेतृत्व आवश्यक ठरते.