संतोष मासोळे

धुळे : कुस्तीतील डावपेचांचा समाजकार्यातही अवलंब करून वाहवा मिळविणारा भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून धुळे जिल्ह्यातील जयसिंग गिरासे यांनी ओळख निर्माण केली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा आणि सर्वधर्मसमभाव जपणारा कार्यकर्ता म्हणून गिरासे यांच्याकडे पाहिले जात आहे. रावसाहेब म्हणून जिल्ह्यात ते ओळखले जातात. ४२ वर्षांच्या गिरासे यांनी मुक्त विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली असून १५ वर्षे धुळे तालुक्यातील बेहेड या गावचे सरपंचपद भूषविले आहे.

जिल्ह्यातील पहिले लोकनियुक्त सरपंच होण्याचा मानही गिरासे यांनी मिळविला आहे. शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील आणि हिलाल माळी यांचे गिरासे हे प्रारंभी कट्टर समर्थक होते. नंतर त्यांच्यातील गुण ओळखून भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांना जवळ केले. कुस्तीची आवड असलेल्या गिरासे यांनी २००३-०४ मध्ये जालना येथे आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले आहे. आपल्यातील ताकदीचा उपयोग केवळ कुस्तीसाठी न करता वडिलोपार्जित १० एकर शेती असतानाही त्यांनी परिसरातील वाडी-शेवाडी धरणाच्या कामावर ४० रुपये रोजंदारीने काम केले. याच काळात ४५ रुपये रोज याप्रमाणे विहिरींचे खोदकामही केले. गावात लहानमोठे समाजकार्य सुरू केले.

हेही वाचा: दिव्या ढोले : कॉर्पोरेट क्षेत्रातून राजकारणाकडे

गिरासे यांनी ‘शिरपूर पॅटर्न’चा अभ्यास करून गावाशी जोडणाऱ्या सहा नाल्यांवर २३ बंधारे बांधून पाणी अडविले. त्याचा उपयोग गावाला सिंचनासाठी झाला. गावातील कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्ययात्रेच्या खर्चासाठी दोन हजार आणि दशक्रिया विधीसाठी तीन हजार, असे पाच हजार रुपये शोकाकुल कुटुंबीयांना देण्याची गिरासे यांची योजना गावकऱ्यांना भलतीच भावली. गावविकासासाठी अनेक जणांकडून निधी मिळविला आहे. २०१० पासून गिरासे यांचा गावावर एकछत्री प्रभाव राहिला आहे. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त, संपूर्ण गावात गटारी, डास निर्मूलनाचे प्रभावी काम, सुंदर अंगणवाडी, इंग्रजी माध्यमाची शाळा अशी अनेक कामे त्यांनी केली.

हेही वाचा: रविकांत वरपे : समाज माध्यमांचे समन्वयक ते प्रवक्तेपदाचा प्रवास

आदिवासींसाठी स्वतंत्र स्मशानभूमी असावी म्हणून दोन एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. २०१५ पासून पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारी योजना त्यांनी सुरू केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून गिरासे यांची निवड झाल्यावर कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना क्विंटलमागे एक रुपये पाच पैसे बाजार समिती शुल्क देण्याची जाणीव करून दिली. २० वर्षांपासून केवळ १६ कंपन्या हे शुल्क भरत होत्या. गिरासे यांनी शुल्क न भरणाऱ्या ६६ कंपन्यांना त्यासाठी बजावले आहे.

Story img Loader