प्रबोध देशपांडे
अकोला : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शेती प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील होऊन आपल्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाला हादरवणारे नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर यांचे नाव प्रकर्षाने समोर आले आहे. शेतकरी चळवळीसह राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणारे रविकांत तुपकरांचे नेतृत्व अष्टपैलू ठरले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरकाठावर वसलेल्या सावळा गावात शेतकरी कुटुंबात तुपकर यांचा १३ मे १९८५ रोजी जन्म झाला. कुटुंबातील कुणालाच राजकारणाचा वारसा नाही. आई-वडील शेतकरी. बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा येथे झाले. कला शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय, त्याला दुग्धव्यवसायाची जोड. तुपकरांनी दररोज सकाळी घरोघरी दूध वाटपाचे काम केले.
विद्यार्थीदशेतच शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शेतकरी चळवळीत उडी घेतली. गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी चक्क विहिरीत बसून उपोषण केले. तेव्हापासून रविकांत तुपकरांचे प्रारंभ झालेले आंदोलनसत्र अविरतपणे सुरूच आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न, खते आणि बियाण्यांचा प्रश्न, पीककर्ज या विषयांवर त्यांनी अनेक आंदोलने केली.‘रविकांत तुपकर आणि आंदोलन’ असे समीकरणच तयार झाले आणि संपूर्ण विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा देणारा रविकांत तुपकर हा युवा नेता नावारूपास आला.
हेही वाचा: महेश लांडगे : क्रीडाप्रेमी आमदार
कालांतराने तुपकरांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली व पश्चिम महाराष्ट्रातही त्यांचा नावलौकिक निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आक्रमक होणाऱ्या तुपकरांवर तडीपारीची कारवाई देखील झाली. २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याचा परिणाम त्यांनी आपल्या आंदोलकवृत्तीवर कधीच होऊ दिला नाही. चळवळीशी इमान राखत प्रामाणिकपणे लढत राहण्याला प्राधान्य दिले. त्याचे बक्षीस म्हणून त्यांच्या गळ्यात वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची माळ पडली. त्यापासून मिळणारे संपूर्ण मानधन त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देत असल्याचे लक्षात आल्यावर राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार तुपकरांनी पदत्याग केला. विदर्भात सर्वदूर पिकणाऱ्या कापूस आणि सोयाबिनचा प्रश्न त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेला.
हेही वाचा: तेजस्वी बारब्दे : ग्रामविकासाचा ध्यास
३० डिसेंबर २०२१ला त्यांच्या नेतृत्वात निघालेला सोयाबिन-कापूस उत्पादकांचा एल्गार मोर्चा विक्रमी ठरला. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग करून आंदोलनाचा भडका राज्यभर पेटवला. त्यामुळे राज्यच नव्हे, तर केंद्र सरकारनेही त्यांना चर्चेला बोलावले व कापूस-सोयाबिन उत्पादकांच्या आंदोलनाला यश आले. आंदोलन आणि शेतकरी चळवळ एवढ्यापुरतेच तुपकर मर्यादित राहिले नाहीत. साहित्य, कला, नाट्य, संगीत, मनोरंजन, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य सुरूच असते. बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन त्यांनी घेतले. ‘स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर’च्या माध्यमातून प्रत्येकाची समस्या सोडवण्याची त्यांची धडपड असते. विदर्भात शेतकरी चळवळ जिवंत ठेवणारा, शेतकऱ्यांसाठी लढणारा तसेच युवा पिढीचा चेहरा असे सर्वांगीण नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांकडे पाहिले जाते.