खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून बैठका घेत आहेत, असे छायाचित्र ट्वीट केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. मुख्यमंत्री कार्यालय आणि खासदार शिंदे यांना खुलासा करावा लागला. हे छायाचित्र प्रकाशात आणले होते ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयात माहिती तंत्रज्ञान, माध्यमे व समाज माध्यम समन्वयक म्हणून पक्षात काम करण्यास सुरुवात केली. २०१०च्या आसपास पक्षाचे मुख्यालय डिजिटल करण्याचे काम वरपे यांनी केले होते. पक्ष नेत्यांच्या पत्रकार परिषदांचे नियोजन, पक्षाची प्रसिद्धी ही कामे ते करीत असत.
२०१४ ते २०१८ या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधातील विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीच्या विरोधातील त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली. नक्षलग्रसत गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार आदिवासींचा मोठा मोर्चा राष्ट्रवादीच्य वतीने काढण्यात आला होता. त्याचे सारे नियोजन वरपे यांनी केले होते. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
हेही वाचा:: रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे केले होते. २०१९ मध्ये त्यांच्याकडे प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. करोना काळातही राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्ममातून करोना रुग्णांना मदत करण्यावर भर दिला. कोणताीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खडतर प्रवास करीत पुढे आलेल्या वरपे यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली.