आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांचा युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पक्ष (वायएसआरटीपी) नावाचा पक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शर्मिला यांची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनवायएसआरटीपी हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाच आता शर्मिला यांनी थेट दिल्लीला जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
शर्मिला यांनी घेतली राहुल गांधी, सोनिया गांधींची भेट
याच वर्षाच्या मे महिन्यात वाय एस शर्मिला यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बंगळुरू येथे भेट घेतली होती. काँग्रेस पक्षाने अन्य राज्यांतील निवडणुका जिंकल्यामुळे अभिनंदन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. या भेटीनंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा येथे राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीपासून शर्मिला आणि काँग्रेस पक्षात जवळीक वाढत आहे, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता त्यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
केसीआर यांचे राज्य संपुष्टात येण्यास सुरुवात- शर्मिला
या भेटीबाबत शर्मिला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. वाय एस राजशेखर रेड्डी यांची कन्या म्हणजेच मी शर्मिला तेलंगणातील लोकांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणार आहे. मी एक गोष्ट निश्चित सांगू शकते की केसीआर यांचे राज्य संपुष्टात येण्यास सुरुवात झाली आहे,” असे शर्मिला म्हणाल्या. या वर्षाच्या शेवटी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत केसीआर यांचा पराभव होईल, असे त्यांना सांगायचे होते.
दरम्यान, वायएसआरटीपी पक्षाचे प्रवक्ते कोंडा राघव रेड्डी यांना या भेटीबद्दल विचारण्यात आले. त्यांनी मात्र शर्मिला या दिल्लीला जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, याची आम्हा कोणालाही कल्पना नव्हती, असे रेड्डी यांनी सांगितले.
शर्मिला पालेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार
शर्मिला यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी पालेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. त्यांनी २०१९ साली आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बंधू जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यानंतर त्यांनी तेलंगणामध्ये वायएसआरटीपी नावाने नव्या पक्षाची स्थापना केली.
दरम्यान, शर्मिला यांनी गांधी कुटुंबाची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठल्यामुळे वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. शर्मिला यांच्या मनात नेमके काय आहे? तेलंगणाच्या राजकारणात भविष्यात काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.