मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेने दहापैकी दहा जागांवर विजय मिळविल्याने ठाकरे गटाच्या तरुणाईमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. लोकसभा, पदवीधर, शिक्षक आणि आता मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाला लक्षणीय यश मिळाल्याने विधानसभा निवडणूक प्रचारातही युवा सेना आघाडीवर राहणार असल्याचे चित्र आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक असली तरी त्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते. अनेक नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात या निवडणुकीने झाली आहे. भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा सेनेचे नेतृत्व आहे. दोन वर्षे रखडलेली मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शुक्रवारी घ्यावी लागली. विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठ प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या अधिसभा सदस्यांच्या दहा जागांसाठी ४१ विद्यार्थी रिंगणात उतरले होते. ठाकरे गटाच्या युवा सेना विरुद्ध भाजपच्या अभविपच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत राजकारण करू नये, असा संकेत असला तरी ही निवडणूक सत्ताधारी व विरोधक पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. खोटी नाव नोंदणी केल्याच्या आरोपावरून ही निवडणूक एकदा रद्द करण्यात आली, तर दुसऱ्यांदा शासनाने निवडणूक पुढे ढकलली. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत युवा सेनेने दहापैकी दहा जागा जिंकल्या. त्यानंतर युवा सेनेने मुंबई विद्यापीठाजवळ आणि शनिवारी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जल्लोष केला. ढोल-ताशे आणि गुलाल उधळत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात आदित्य, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सहभागी झाले होते.
या निवडणुकीची व्यूहरचना युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली होती. बंड केलेले आमदार शिवसेनेत असताना जेवढी विद्यार्थी मतदार नोंदणी झाली नव्हती, त्यापेक्षा जास्त नोंदणी यावेळी झाली. ही तर एक सुरुवात आहे. विधानसभा अजून बाकी आहे. अशाच प्रकारचा विजय विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मिळवणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.