खेड तालुका शिवसेनेने बंडखोर आमदार योगेश कदम यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला असतानाच तालुक्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांच्या विरोधात बॅनर फडकावले आहे’आम्ही शिवसेनेसोबत, ठाकरेंसोबत..’ असा मजकूर या बॅनरवर लिहिला असून कै. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोरे आणि काही युवा पदाधिकाऱ्यांची छायाचित्रेही त्यात आहेत.
खेड तालुका शिवसेनेच्या वतीने गेल्या शनिवारी भरणे येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. आमदार योगेश यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर करण्यात आला. मात्र त्या पाठोपाठ तालुका युवा सेनेने भरणे येथेच हे बॅनर लावून या निर्णयाला विरोध नोंदवला आहे.
दरम्यान, आमदार कदम यांचे वडील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मात्र आपण मरेपर्यंत भगव्यासोबत, अर्थात उध्दव ठाकरेंसोबतच राहू, असे जाहीर केले आहे.