Zeeshan Siddique काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) यांच्या वडिलांची म्हणजेच बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. त्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती. तसंच या प्रकरणाचा तपास लवकर लागावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. आता काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने काय वचन दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी कसा शब्द फिरवला ते सांगितलं आहे.
काय म्हणाले आहेत झिशान सिद्दिकी?
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत झिशान सिद्दिकी म्हणाले, “माझे वडील बाबा सिद्दिकी यांना ठार करण्यात आला. त्यानंतर मला महाविकास आघाडीकडून सहकार्याची अपेक्षा होती. मला त्यांनी शब्दही दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला.”
१२ ऑक्टोबरला काय घडलं?
झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) म्हणाले “१२ ऑक्टोबरला माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. त्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं आहे. त्या दिवशी (१२ ऑक्टोबर) मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो. बाबा सिद्दिकींची त्याच दिवशी रात्री हत्या करण्यात आली. मी तेव्हा जेवणाची ऑर्डर देत होतो आणि मला फोन आला तुमच्या वडिलांवर हल्ला झाला आहे. मी धावत त्या ठिकाणी गेलो. माझ्या वडिलांना मी रुग्णालयात नेलं. माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर काही तासांतच डॉक्टर म्हणाले की आता बाबा सिद्दिकी आपल्यात नाहीत. मला काही सुचलंच नाही. वडिलांना पाहून मी रडू लागलो.” असं झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं. माझ्या वडिलांना का मारलं गेलं? मी त्यानंतर हा प्रश्न पोलीस अधिकारी आणि इतर अनेकांना विचारला आहे असंही झिशान सिद्दिकी म्हणाले. या प्रकरणात नंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आलं अशीही माहिती झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) यांनी दिली.
निवडणुकीबाबत काय म्हणाले झिशान सिद्दिकी?
माझ्या वडिलांना १२ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात त्यांचा जीव गमवावा लागला. त्यांचं रक्त माझ्यात वाहतं आहे. माझे वडील एखाद्या शूर सिंहाप्रमाणे होते. मीदेखील त्यांच्याप्रमाणेच लढणारा आहे हरुन जाणारा नाही. त्यांनी गरीबांच्या घरासाठी लढा दिला होता, तसंच त्यांच्या हक्कांसाठी ते लढले होते. मी देखील ते करणार आहे असंही झिशान सिद्दिकी म्हणाले.
Zeeshan Siddique-Salman Khan threatened : झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी
मुस्लिम बांधव मला पाठिंबा देतील
c
तुम्ही अजित पवारांच्या पक्षात आहात तुम्हाला मुस्लिम बांधव पाठिंबा देतील का? असं विचारलं असता झिशान सिद्दिकी म्हणाले, “होय मला खात्री आहे की लोक, माझ्या समाजाचे लोक मला मतदान करतील. वांद्रे पूर्व या जागेवरुन मी लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला. त्यांनी शब्द फिरवला.” असं झिशान सिद्दिकी म्हणाले.
मला पाठिंबा देणार असं मविआने मान्य केलं होतं पण..
महाविकास आघाडीचे नेते माझ्या घरी आले होते. त्यांनी मला पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं. त्यांनी प्रस्ताव आणला होता. मात्र नंतर मला अंधारात ठेवण्यात आलं. त्यानंतर अचानक एके दिवशी उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाईंचं नाव वांद्रे पूर्व मधून म्हणजेच माझ्या मतदारसंघातून त्यांना तिकिट दिलं. याला गद्दारी, फसवणूक काय म्हणायचं? हे मला समजत नाही. मी त्यामुळेच महाविकास आघाडीबरोबर राहिलो नाही. असंही झिशान सिद्दिकी म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd