उन्हाळा म्हटलं की आजकालच्या मुलांना आइस्क्रीमच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटतं.
शहरांमध्ये गल्लोगल्ली असलेली आइस्क्रीम पार्लर्स बारा महिने सुरू असतात, पण त्यांच्या दारातली गर्दी वाढली की समजायचं उन्हाळा आला, पण अगदी २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत उन्हाळा आल्याची ग्वाही आइस्क्रीम पार्लर्स नव्हे तर रसवंती गुऱ्हाळं द्यायची. भाजीवाल्याच्या टोपलीत दिसणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्या ही ग्वाही फिरवायच्या. होलसेल बाजारात कोपऱ्याकोपऱ्यांतून करवंद-जांभळाच्या टोपल्या घेऊन आदिवासी विक्रेते दिसायला लागले की उन्हाळा अगदी मध्यावर आला, हे समजायचं. रसरशीत, पाणीदार ताडगोळेवाले हातगाडय़ा घेऊन फिरायला लागले की आपल्या जिवाची काहिली कमी व्हावी यासाठी निसर्गाने त्याचा संपन्न ठेवा पाठवला आहे, याची जाणीव व्हायची. आता उन्हाळ्यात कल्पनाही केली नसेल एवढय़ा वेगवेगळ्या फ्लेवर्सची आइस्क्रीम्स मिळतात; पण उसाचा रस, करवंदं, जांभळं, कैऱ्या, ताडगोळे यांची मजा काही त्यात नाही. हा रानमेवा आता जसजसा कमी मिळायला लागला आहे, तसतशी त्याची गंमत किती मोलाची होती, हे सगळ्यांनाच जाणवायला लागलं आहे.
उन्हाळ्यात कामासाठी पायपीट करताना कुठेही जा, कोपऱ्याकोपऱ्यांवर रसवंती गुऱ्हाळं असायची. दमला-भागल्या, उन्हानं कावल्या जिवाची पावलं आपोआप रसवंतीगृहाकडे वळायची. आपल्यासमोरच मशीनच्या चरकातून काढून दिलेला ताजा ताजा उसाचा रस.. त्यात आलं-लिंबूही टाकलं जायचं. रसवंतीगृहात मिठाच्या एकदम निमुळतं तोंड असलेल्या (हल्ली सॉससाठी ठेवलेल्या असतात तशा) बरण्या ठेवलेल्या असायच्या. मधुर असा उसाचा रस, त्याला आलं-लिंबूच्या आंबट-किंचित तिखट चवीची जोड आणि चिमूटभर मीठ या सगळ्याचं ते मिश्रण असं काही थंडावा द्यायचं, की कोणतंही कोल्ड्रिंक त्याच्यापुढे फिकं पडेल. उसाचा रस बर्फ घालूनच प्यायचा, असा तेव्हा अलिखित नियम असायचा आणि बर्फ चांगल्या पाण्याचा असेल की नाही, उसाच्या कांडय़ा स्वच्छ धुतलेल्या असतात की नाही, रसवंतीगृहवाला आधीच्या लोकांनी प्यायलेले ग्लास नीट धुतो की नाही, असले प्रश्नही कुणाला पडायचे नाहीत. मुळात आरोग्याचे असे चोचले कुणाला सुचायचेही नाहीत.
या उसाच्या रसाची एक गंमत असायची. दहा रुपयाला फुल ग्लास रस असेल तर पाच रुपयाला हाफ ग्लास रस मिळायचा आणि हाफ ग्लास हा प्रत्यक्षात फुल ग्लासच्या पाऊण कप असायचा. म्हणजे एकाच माणसाने दोन वेळा हाफ ग्लास रस प्यायला तर त्याला दहा रुपयांत दीड ग्लास रस मिळायचा. कॉलेजमधल्या मुलांच्या असल्या गमती रसवंतीगृहवाल्यांनाही कळत असणारच, पण कदाचित त्यांनाही परवडत असणार ते सगळं. हेल्थ कॉन्शस म्हणजे तेव्हाच्या काळात जगावेगळी माणसं उसाच्या रसात बर्फ नको म्हणून सांगायची तेव्हा रसवंतीगृहवाला त्या बर्फविरहित रसाचे जास्त पैसे लागतील म्हणून सांगायचा नाही, उलट त्या माणसाकडे ‘बिचारा’ म्हणून बघायचा.
रसवंतीगृह हे तर वेगळंच प्रकरण असायचं. उन्हाळ्याच्या आसपास सुरू होणारी ही रसवंतीगृहे म्हणजे संबंधित लोकांचा हंगामी व्यवसाय असायचा. त्यामुळे ती रसवंतीगृहेसुद्धा तात्पुरती बांधलेली असायची. लाकडं, तरटं या सगळ्यांचा वापर करून बांधलेलं रसंवतीगृह. त्याच्या दाराशी विजेवर चालणारं त्याचं ऊस गाळणारं मशीन ठेवलेलं असायचं. त्या मशीनला हमखास घुंगरू बांधलेलं असायचं. मशीन फिरायला लागलं की त्याचा मंजूळ नाद सुरू व्हायचा. तो लांबवर ऐकू यायचा. त्यामुळे तहानलेल्यांची पावलं हमखास आवाजाच्या दिशेने वळायची. आत गेल्यावर तिन्ही दिशांनी बसायची बाकडी आणि टेबलं. या दोन्ही गोष्टी कुठल्या कुठल्या लाकडाच्या पट्टय़ा ठोकून तयार केलेल्या असायच्या. रसवंतीगृहाचं हमखास वैशिष्टय़ म्हणजे जिथे जिथे िभतींवर जागा असेल तिथे तिथे लटकवलेली कॅलेंडर्स. उन्हाळ्यापुरत्या असलेल्या या हंगामी बिझनेसमध्ये वर्षभराचा धांडोळा घेणारी कॅलेंडर्स का लावलेली असायची कुणास ठाऊक. आणि मुख्य म्हणजे त्या कॅलेंडर्सवर ज्या कुणा उत्पादनाची असलेली जाहिरात लक्षात येण्यापेक्षा त्यावर असलेल्या देवादिकांच्या फोटोंकडे लक्ष जायचं. अगदीच एखादा रसवंतीगृहवाला मनाने तरुण असेल तर तो अमिताभ, धर्मेद्र, हेमामालिनी यांचे फोटो असलेली कॅलेंडर्स लावायचा. त्या काळातलं कुणीही आजही घरातल्या भिंतींवर दोनपेक्षा जास्त कॅलेंडर्स असतील किंवा चित्र-फोटो जरा जास्तच लावले असतील तर अगदी न चुकता म्हणणारच की ‘घराचं काय रसवंतीगृह करायचंय का?’
येता-जाता रसवंतीगृहात रस प्यायला जायचा तसाच तो लिटरवर घरी आणूनही सगळ्यांनी मिळून काही तरी खात, गप्पा मारत प्यायला जायचा. घरातली एखादी आजी तिच्या लहानपणची घरच्या शेतात लावल्या जाणाऱ्या गुऱ्हाळाची आठवण सांगायची आणि मग उसाचा रस घालून केल्या जाणाऱ्या ज्वारीच्या भाकरी कशा चविष्ट लागायच्या याची आठवण निघायची. गुऱ्हाळ रसाचं असायचं तसंच गुळाचंही असायचं. असं गुळाचं गुऱ्हाळ लावणं, त्याचा गूळ करणं, त्याआधीच्या पायरीवर काकवी करणं, गुऱ्हाळाला जवळच्यांना आमंत्रण देणं हा पश्चिम महाराष्ट्रात लहान लहान गावांमधून कार्यक्रमच असायचा. ते सगळं इतकं उसाभरीचं आणि तरीही निवांत असायचं की त्याने मराठी भाषेला ‘चर्चेचं गुऱ्हाळ लावणं’ असा शब्दप्रयोगही दिला.
आता जागेची किंमत फारच वाढल्यामुळे रसवंतीगृहांच्या मोक्याच्या जागा गेल्या; पण गंमत म्हणजे अशी मशीनवर चालणारी रसवंतीगृहे येण्याआधी ज्या पद्धतीने उसाच्या रसाचं लाकडाचं गुऱ्हाळ असायचं, तशी फिरती गुऱ्हाळं शहरांमध्ये ठिकठिकाणी दिसायला लागली आहेत.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com