गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी पाणीसाठा जास्त
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन धरणांमध्ये मिळून १०.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा राहिला आहे. एक धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापर्यंत शहर आणि ग्रामीण भागासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. उर्वरित तीन धरणांमध्ये १० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. वरसगाव धरणांत ४.१७ टीएमसी, पानशेत धरणात ४.९२ आणि खडकवासला धरणात १.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ७ मे पर्यंत धरणांमध्ये ५.३२ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. मात्र, हा अतिरिक्त पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या नियोजनापेक्षा ऑक्टोबर महिन्यापर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून उन्हाळ्यात धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागासाठी दोन सिंचन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणेकरांसाठी यंदा चांगला पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या १० टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील चार किंवा साडेचार टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना १.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. या बाबी लक्षात घेतल्या तरीदेखील पाऊस सुरू होईपर्यंत धरणांमध्ये अडीच ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी लांबलेला पाऊस यंदा पथ्यावर पडला असून पुणेकरांसाठी सध्या मुबलक पाणी उपलब्ध आहे.
८ मे पर्यंत धरणांमधील पाणीसाठा
’ ८ मे २०२० – १० टीएमसी
’ ८ मे २०१९ – ५.३२ टीएमसी
’ ८ मे २०१८ – ८.१६ टीएमसी
’ ८ मे २०१७ – ८.०७ टीएमसी
’ ८ मे २०१६ – ६.८८ टीएमसी
जुलैअखेर पुरेल इतका पाणीसाठा
दिवसाआड पाण्यामुळे तक्रारी कमी झाल्याचा पिंपरी पालिकेचा दावा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात जवळपास ५० टक्के पाणीसाठा असून जुलैअखेरीपर्यंत तो पुरेल, असा विश्वास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून पाण्याविषयी तक्रारी खूपच कमी झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे.
करोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नेहमीचे इतर प्रश्न, समस्या बाजूला पडल्या आहेत. पाणीपुरवठा हा विषयही त्याला अपवाद नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला शहरवासीयांच्या पाणीपुरवठय़ाविषयी तक्रारी वाढतात. अपुऱ्या, विस्कळीत तथा दूषित पाण्याच्या मुद्दय़ावरून ठिकठिकाणी आंदोलने होतात, त्यावरून पक्षीय राजकारण सुरू होते, असे चित्र दरवर्षी दिसून येते. यंदा तसे झाले नाही.
गेल्या वर्षी ६ मेपासून पिंपरी पालिकेने दिवसाआड आणि एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यानुसार, शहरातील गावे, वस्त्यांची वर्गवारी करून शहरवासीयांना दिवसाआड मात्र पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. या निर्णयामुळे पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी खूपच कमी झाल्या. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत कोणत्याही तक्रारी आल्याच नाहीत. सध्या पुरेसा पाणीसाठा असून तो तीन महिने व्यवस्थित पुरेल. पावसाळा उशिरा सुरू झालाच तर वेगळे नियोजन करावे लागेल, असे या विभागाकडून सांगण्यात आले.
पवना धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. तो तीन महिने चांगल्या प्रकारे पुरेल. पावसाळा लांबल्यास वेगळे नियोजन करावे लागेल. दिवसाआड पाणीपुरवठय़ाच्या निर्णयामुळे शहरातील पाण्याविषयीच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
– रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग