जादू म्हणजे हातचलाखी हा भ्रम खोटा ठरवीत जादूच्या मायाजालाने गेली ७५ वर्षे रसिकांना खिळवून ठेवणारे जादूगार रघुवीर यांच्या तीन पिढय़ांचा मिळून १५ हजारावा प्रयोग रविवारी (८ मे) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. या प्रयोगामध्ये जादूगार विजय रघुवीर, जितेंद्र रघुवीर आणि ईशान रघुवीर (चौथी पिढी) अशा तीन पिढय़ा रंगमंचावर जादूच्या मायाजालाची सफर घडविणार आहेत.
जादूच्या कलेमुळे जगभरातील २७ देशांचा प्रवास केला असला, तरी पुणे ही जादूगार रघुवीर यांनी आपली कर्मभूमी मानली. त्यामुळे १५ हजार प्रयोग हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना शहराच्या विविध भागातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सलग तीन दिवस तीन प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (६ मे) पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे आणि शनिवारी (७ मे) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रयोग होणार असून बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता विक्रमी १५ हजारावा प्रयोग होणार आहे. आम्ही तीन पिढय़ा जादूचे प्रयोग करीत असल्याने पीएनजी ज्वेलर्स, चितळे बंधू मिठाईवाले, देसाई बंधू आंबेवाले आणि गिरिकंद ट्रॅव्हल्स असे तीन पिढय़ांपासून व्यवसायामध्ये असलेल्या व्यावसायिकांचे या प्रयोगांस प्रायोजकत्व असल्याची माहिती जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी दिली.
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. त्यांचे चिरंजीव विजय रघुवीर यांनी १९७७ पासून आतापर्यंत ६ हजार ३३० प्रयोग केले असून मी १ हजार ६४७ प्रयोग केले आहेत, असे जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले. या तीनही प्रयोगांमध्ये माझा मुलगा ईशान याचाही सहभाग असल्याने तीन पिढय़ा एकाच रंगमंचावर दिसणार आहेत. या प्रयोगामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.