भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगपूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली असल्याचेही पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवड्याची करोना आढावा बैठक शुक्रवारऐवजी सोमवारी घेतली. या बैठकीमधील चर्चेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.

“सुधीर मेहता हे जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था अपग्रेट करण्यासाठी इतर व्यवसायिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागील वर्षभरामध्ये जवळजवळ २०० कोटी उभे केलेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मला सांगितलं की सिंगापूरमध्ये काही आरोग्य विषय साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना ८००० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर असल्याचं सांगितलं. सिंगापूर सरकारचा एक कॉर्पोस फंड आहे. जो जगातील सर्वात मोठ्या चॅरीटी फंडपैकी एक आहे. याअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहतांना ऑफर दिली की ५० टक्के रकमेमध्ये आम्ही तुम्हाला हे देतो. न्यायची व्यवस्था करा असं मेहतांना सांगण्यात आलं, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यासंदर्भात मेहता यांनी पाटील यांना कळवलं असता पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहिलं. “माझ्याकडे हा विषय आला. मी मोदीजींना पत्र लिहिलं. केंद्र सरकारने विमानाने या गोष्टी आणण्याची तयारी दर्शवली आहे. कालच मोदी आणि एअर इंडियाच्या प्रमुखांचं बोलणं झालं आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून या गोष्टी एअरलिफ्ट केल्या जाणार आहेत. मेहता हे इथल्या उद्योजकांच्या माध्यमातून पैसे उभे करतायत. त्यामधून अगाऊ रक्कम दिली जाईल. मग हे भारतात आल्यानंतर त्याचं वितरण होईल,” असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना, “हे सर्व साहित्य भारतात आल्यानंतर ४००० हजार कॉन्सन्ट्रेटर्स भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील भाजपा अध्यक्षाच्या माध्यमातून दहा याप्रमाणे वितरित करायचे आणि त्याची बँक निर्माण करायची”, अशी योजना असल्याचं पाटील म्हणाले.

औरंगाबादमधून १२ ऑक्सिजनच्या प्लॅण्टमधून त्यांनी ऑक्सिजन विकत घेतला आहे. ते आता वेगवेगळ्या रुग्णालयांना ते देणार आहेत. एका ऑक्सिजन प्लॅण्टमधून २०० जणांना म्हणजेच २४ जणांना ऑक्सिजन देण्याची सोय महेतांनी केलीय. मेहतांनी आणलेले ऑक्सिजन प्लॅण्ट रुग्णालयांमध्येच उभे करावे लागणार असून त्यासाठी २०-२२ दिवस लागतात. त्यामुळे ही सेवा लवकरच उपलब्ध होईल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.

Story img Loader