अंतिम मंजुरीसाठी उद्या सभा
पिंपरी पालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील अंदाजपत्रकावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. तब्बल नवीन ७२९ कामांचा समावेश करण्याची शिफारस सभेकडे करण्यात आली आहे. अंतिम मान्यतेसाठी शुक्रवारी (२३ मार्च) दुपारी सभा होणार आहे.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखालील सर्वसाधारण सभेत दोन टप्प्यात मिळून जवळपास बारा तास अंदाजपत्रकावर चर्चा झाली. सुमारे २५ ते ३० नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. माई ढोरे, सीमा सावळे, अजित गव्हाणे, मंगला कदम आदींनी अधिक विस्ताराने अंदाजपत्रकावर भाष्य केले. रात्री साडनऊ वाजता सभेचे कामकाज संपले, तोपर्यंत अंदाजपत्रकात नव्याने ७२९ कामांचा समावेश करण्याची शिफारस सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यासाठी एकत्रित स्वरूपाच्या चारच उपसूचना तयार करण्यात आल्याचे नगरसचिव विभागातून सांगण्यात आले.
नव्याने सुचवण्यात आलेल्या कामांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यातून ग्राह्य़ व अग्राह्य़ कामे अशी विभागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर, ग्राह्य़ ठरलेल्या उपसूचनांना सभेची मान्यता घेतली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सभेचे उर्वरित कामकाज होणार असल्याचे सांगण्यात आले.
अंदाजपत्रकातील २५० पाने कमी
स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करताना, त्यातील २५० पाने कमी केल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आवर्जून सांगितले होते. तथापि, नव्याने सुचवण्यात आलेल्या कामांची संख्या पाहता ती पाने कमी केल्याचा कितपत उपयोग होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.