पिंपरी: वाहन उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या टाटा मोटार्स कंपनीने आजपासून कारखान्यातील कामास सुरुवात के ली असली, तरी प्रत्येक कर्मचाऱ्यास मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक केल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यांच्याकडे हे अॅप सुरू नसेल त्यांना एकतर माघारी पाठवण्यात येत होते,अथवा त्यांना ते जागीच डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत होते.
कर्मचाऱ्यांच्या मोबाइल दूरध्वनीवर आरोग्य सेतू अॅप सुरू ठेवणे बंधनकारक करणारा आदेश केंद्र सरकारने रविवारी जाहीर केलेल्या टाळेबंदी ४ च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिल करण्यात आला आहे. आरोग्य सेतू अॅपची सक्ती करणे अव्यवहार्य असल्याचा आक्षेप मोठय़ा प्रमाणात घेण्यात आल्यानंतर याबाबतच्या आदेशात बदल करण्यात आला. तरीही अॅपची सक्ती करण्यात येत असल्याचे सोमवारी दिसून आले.
प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग सुरू करण्यास राज्यसरकारने परवानगी दिल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर सोमवारपासून अनेक कंपन्यांमध्ये कामकाज सुरू झाले. उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीने कार विभाग आणि ट्रक विभागातील सुमारे एक हजार कामगारांना सोमवारी कामावर बोलावण्याचे नियोजन केले होते. प्रवेशद्वारापाशी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. ज्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्यसेतू अॅप नव्हते, त्यांना परत पाठवण्यात येत होते. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच कामावर रूजू करून घेण्यात येत होते, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाची प्रतिक्रिया समजू शकली नाही.