भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक अभय फिरोदिया यांची, तर मानद सचिवपदी डॉ. मैत्रेयी देशपांडे यांची निवड करण्यात आली. अॅड. विनायक अभ्यंकर हे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.
संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नव्याने निवडून आलेल्या नियामक मंडळाच्या सभासदांची बैठक झाली. त्यामध्ये नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी अॅड. सदानंद ऊर्फ नंदू फडके यांची, तर उपाध्यक्षपदी प्रा. हरी नरके यांची निवड करण्यात आली.
निवडून आलेल्या २५ जणांच्या नियामक मंडळातून सात सदस्यांचा समावेश असलेले कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. डॉ. श्रीकांत बहुलकर यांची कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी, तर चार्टर्ड अकौंटंट संजय पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मानद सचिव मैत्रेयी देशपांडे यांच्यासह वसंत वैद्य, डॉ. सदानंद मोरे, भूपाल पटवर्धन आणि डॉ. सुधीर वैशंपायन यांचा कार्यकारी मंडळामध्ये समावेश आहे.