पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवडगावातील चापेकर चौकासह परिसरात वर्षांनुवर्षे असलेली अतिक्रमणे काढण्याची मोठी कारवाई पिंपरी पालिकेने गुरूवारी सुरू केली. नागरिकांचा कडवा विरोध असतानाही पालिकेने मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

गेल्या काही वर्षांपासून चिंचवडगावात विशेषत: चापेकर चौकात अतिक्रमणांनी कहर केला आहे. क्रांतिवीर चापेकर यांचे समूहशिल्प अतिक्रमणांनी वेढलेले असते, हे कायमचे चित्र होते. या परिसरातील अतिक्रमणांना काही प्रमाणात लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांचे संरक्षण होते. त्या मोबदल्यात काहींची हप्तेगिरी सुरू होती. त्यामुळे काही केल्या अतिक्रमणांवर कारवाई होत नव्हती. वर्तमानपत्रात सतत बातम्या येत होत्या. जागरूक नागरिक तसेच ग्रामस्थ यासंदर्भात तक्रारी करत होते. अखेर, या पाठपुराव्यानंतर अखेर पालिकेला गुरूवारी कारवाईचा मुहूर्त मिळाला. सकाळपासूनच पोलीस चिंचवडगावात जमा झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवळपास १५० पोलिसांचा फौजफाटा आणि पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर नागरिकांनी विरोधाचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता पालिका आणि पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केली. सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील सकाळी सुरू झालेली ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

Story img Loader