पिंपरीच्या शगुन चौकातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईच्या वेळी पथारी व्यावसायिक आणि पथकातील अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. पालिकेच्या कारवाईमुळे शगुन चौक शुक्रवारी पूर्णत: अतिक्रमणमुक्त झाला.
महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पिंपरी कँप, शगुन चौक आणि गोकुळ हॉटेल शेजारील अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात आली. शगुन चौकात कापड गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दहा पथारी व्यावसायिकांचे साहित्य कारवाईत जप्त करण्यात आले. पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण कारवाईला विरोध केला.
कारवाईच्या वेळी पथारी व्यावसायिक आणि अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. अतिक्रमण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे वातावरण शांत झाले. अतिक्रमण पथकाने कारवाईमध्ये दोन हातगाडय़ा, पाच लोखंडी काउंटर,चार लोखंडी टेबल, १७ लोखंडी स्टँड वगैरे साहित्य जप्त केले.
गर्दीचे ठिकाण असलेल्या शगुन चौकामधील अतिक्रमण कारवाईनंतर चौक वाहतुकीला मोकळा झाला. वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रहाटणी फाटा ते डी मार्ट चौक दरम्यानच्या काळेवाडी परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये २३ हातगाडय़ा जप्त करण्यात आल्या. कारवाईच्या वेळी वाकड पोलीस ठाण्याने पोलीस बंदोबस्त दिला होता.