सुविधा आजपासून

पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरासह जिल्ह्य़ात घरपोच मद्यविक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नियमावली बुधवारी जाहीर करण्यात आली. घरपोच मद्यविक्री सुविधा पुण्यात येत्या शुक्रवारपासून (१५ मे) सुरू होणार आहे. मात्र, ही सुविधा देताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे मद्यविक्री दुकानदार आणि मद्य ग्राहकांनी पालन करणे बंधनकारक आहे.

पुण्यात घरपोच मद्यविक्री सुविधा पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित केलेले प्रतिबंध क्षेत्र आणि त्या परिसराच्या पाचशे मीटर क्षेत्रातील मद्यविक्री दुकाने वगळून देता येणार आहे. देशी मद्याची घरपोच सुविधा देता येणार नाही. घरपोच सुविधा मद्यप्राशन करण्यासाठीचा परवाना असलेल्या व्यक्तींनाच दिली जाणार असून ग्राहकांकडे परवाना नसल्यास संबंधित दुकानदार तो देऊ शकेल किंवा ttps://stateexcise.maharashtra.gov.in  किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in  या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. मद्याची घरपोच मागणी नोंदवण्यासाठी मद्यविक्री दुकानदारांनी वॉट्सअ‍ॅप, लघुसंदेश (एसएमएस) आणि दूरध्वनी करण्यासाठी संबंधित क्रमांक दुकानांसमोर लावावेत, असे सांगण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

घरपोच सुविधा देण्यासाठी दुकानदाराला स्वत:ची वितरण व्यवस्था करावी लागणार असून ही संख्या दहापेक्षा जास्त असणार नाही. घरपोच सुविधा देताना एका ग्राहकाला २४ बाटल्यांपेक्षा अधिक मद्य दिले जाणार नसून शहरात महापालिका आयुक्त आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांनी दुकाने उघडी ठेवण्याच्या दिलेल्या वेळेतच ही सुविधा देता येणार आहे. वितरण व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती संतोष झगडे यांनी दिली.

Story img Loader