शहरातील आठपैकी चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तीन काँग्रेसकडे आणि एक मित्रपक्षाकडे असेल, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केलेली घोषणा काँग्रेसला नामंजूर आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अशा घोषणा होतातच. मात्र जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत वरिष्ठ नेतेच घेतील, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत पेच निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे.

आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी जागा वाटपाबाबतची मोठी घोषणा केली. यापूर्वी काँग्रेसकडे असलेल्या हडपसर मतदारसंघासह पर्वती, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढतील. शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ काँग्रेसला दिले जातील आणि कोथरूडची जागा मित्रपक्षाला सोडली जाईल, अशी घोषणा पवार यांनी केली. मात्र अजित पवार यांची ही घोषणा काँग्रेसला मान्य नाही. पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे रहावा, अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्या वेळी काँग्रेसने कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर मतदारसंघ, तर राष्ट्रवादी काँग्रेसने पर्वती, कोथरूड, खडकवासला आणि वडगावशेरी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

‘मतदारसंघांबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी अशा घोषणा केल्या जातात. मात्र कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष निवडणूक लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेणार आहेत. हा निर्णय दिल्लीतून होईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल. आघाडी धर्म काँग्रेसकडून निभावला जाईल. सध्या जागा आणि मतदारसंघांबाबत शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे,’असे बागवे यांनी सांगितले.

Story img Loader