अमोल पालेकर यांचा सवाल
ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत ‘गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण’ असल्याचे म्हणत असतील अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकणार? ‘मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्माचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांसाठीच्या कुठल्याही सुविधा मागण्याचा हक्कच नाही,’ असं विधान करणारे आपले राष्ट्रपती असतील, तर ते सामान्य नागरिकांना घटनात्मक संरक्षण कसे देऊ शकतील?.. असे सवाल ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी उपस्थित केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास चार वर्षे झाली तरी त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या ‘जवाब दो’ या निषेध जागर आंदोलनाच्या व्यासपीठावर पालेकर बोलत होते. ‘हू किल्ड दाभोलकर? जवाब दो, जवाब दो!’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, ‘मुर्दाड शासनाचा तीव्र धिक्कार असो’, अशा घोषणा देत हा मोर्चा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून काढण्यात आला. भर पावसात सुरू असलेल्या या मोर्चात विविध वयोगटातील सुमारे पाचशेहून अधिक जण सहभागी झाले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, कामगारनेत्या मुक्ता मनोहर, डॉ. हमीद दाभोलकर यांच्यासह पुरोगामी विचारांच्या संघटनांचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. साने गुरुजी स्मारक येथे निषेध जागर झाला.
पालेकर म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही ‘रंगाचे’ असो, कोणालाच सत्याला सामोरे जायची इच्छा नसते. ती ताकद तर त्याहून नसते. त्यामुळे न्याय मिळेलच याची शाश्वती कितपत ठेवावी, हाच खरा आजचा प्रश्न आहे. ‘जेथे सुरक्षित वाटेल, तिथे बेधडकपणे जायला तुम्ही मोकळे आहात’, असे माजी उपराष्ट्रपतींना सांगितले जात असेल तर या देशात उद्विग्न होण्यापलीकडे काही करू शकू अशी परिस्थिती नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षांमागून वर्षे उलटत आहेत, मात्र सरकारला त्यांचे मारेकरी शोधण्यात सातत्याने अपयश येत आहे. खरं तर, सरकारला मारेकरी शोधायचे आहेत का, हाच प्रश्न आता पडतो, अशी टीका डॉ. बाबा आढाव यांनी केली. हे सरकारच आता दहशतवाद पोसत आहे. गोरक्षकांनी चालविलेला हिंसाचार एकीकडे आणि सामाजिक कार्य करणारे दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकार दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट आहे.
आढाव म्हणाले, मुख्यमंत्री सतत फक्त आकडय़ांचा आधार घेऊन बोलत असतात. पण हे आकडे कधीच खरे होत नाहीत. ना कर्जमाफीचा आकडा खरा ठरला, ना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडून देणाऱ्यास जाहीर केलेल्या बक्षिसाचे आकडेसुद्धा फसवेच आहेत. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी संवाद साधला.