चढाईसाठी अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असणारा लिंगाणा सुळका अवघ्या २२ मिनिटांत सर करण्याचा पराक्रम पिंपरी-चिंचवडमधील अनिल वाघ यांनी करून दाखवला आहे. लिंगाणा सुळक्याची उंची तब्बल तीन हजार फूट इतकी आहे. तसेच सुळक्याची एकूणच चढाई आव्हानात्मक आहेत. त्यामुळे अनेक कसलेल्या ट्रेकर्सनाही लिंगाणा सुळका चढताना चांगलाच घाम फुटतो. मात्र, अनिल वाघ यांनी कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय लिंगाणा सर करण्याची कामगिरी केली आहे.
रायगड, राजगड आणि तोरणा किल्याच्या मध्यभागी लिंगाणा सुळका आहे. ७ जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजता अनिल वाघ यांनी लिंगाणा सुळका चढायला सुरूवात केली. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी त्यांनी ट्रेकर्सकडून सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा दोर आणि सुरक्षा उपकरणे न वापरण्याचे धाडस केले. मात्र, तरीदेखील अवघ्या २२ मिनिटांत त्यांनी लिंगाणा सर केला. रायगड जिल्ह्यातील डोंगर रांगेतील हा किल्ल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. लिंगाणाच्या आकाराचा हा किल्ल्ला महाडपासून ईशान्येस १६ मैल अंतरावर आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा आणि रायगड लिंगाणा विराजमान आहे. लिंगाण्याचे खड़क २९६९ फुट उंच असून त्याची चढाई चार मैल लांबीची आहे, तसेच त्याची तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. मोरेंचा पराभव केल्यावर शिवाजी राजेंनी रायगडजवळ हा किल्ला बांधला. येथील गुहेत जुने कारागृह होते, त्यात एका वेळेस ५० कैदी ठेवले जायचे. लिंगाणा सुळका चढताना अनिल वाघ यांनी मावळ्याचा वेष परिधान केला होता.
अनिल वाघ हे गेल्या आठ वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये अग्निशमन दलाच्या सेवेत फायरमन या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी २०१२मध्ये ट्रेकिंगला सुरूवात केली. सुरुवातीला त्यांनी साडेतीन हजार फूट उंच असलेला हरिशचंद्र गड यशस्वीपणे सर केला. त्यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा पेक्षा जास्त किल्ले सर केले आहेत. तसेच सह्याद्रीतील अनेक घाटवाटाही त्यांनी पालथ्या घातल्या आहेत. गंगोत्री तीन, भागीरथी दोन, देवतीब्बा, स्टोक घोलप, स्टोक कांगरी, हनुमान तिब्बा, फ्रेंड्स पीक, आयलंड पीक, रोहतांग पास या हिमालयातील ११ शिखरांवर यशस्वीपणे चढाई केली आहे. तसेच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे देखील अनिल वाघ यांनी सर केले आहे. आगामी काळात टांझानियामध्ये असलेल्या किलीमांजारो हे शिखर सर करण्याचा त्यांचा मानस आहे. किलीमांजारो सर करायला जाताना ते सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाणार असून त्याठिकाणी त्यांचा राज्याभिषेक करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.