बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ असावी, बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर होता यावे, उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, असा उदात्त हेतू ठेवून पिंपरी महापालिकेने पुण्यातील ‘भीमथडी जत्रे’च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात ‘पवनाथडी’ जत्रा सुरू केली. २००७ पासून सुरू झालेल्या या पवनाथडीचा गेल्या दहा वर्षांतील लेखाजोखा तपासून पाहिल्यास पवनाथडीची उपयुक्तता किती व त्याचा प्रत्यक्षात लाभ किती जणांना झाला, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. ‘पवनाथडी’साठी होणारा खर्च दरवर्षी वाढतो आहे. आतापर्यंत प्रतिवर्षी खर्चाचा आकडा ५० लाख रुपयांहून जास्त होत होता. यंदाच्या वर्षी ७० लाख रुपयांच्या घरात खर्च जाईल, अशी चिन्हे आहेत. या पुढील काळात खर्चाची उड्डाणे वाढतच राहणार आहेत. महापालिकेचा ‘श्रीमंती’ थाट असल्याने खर्चाचा मुद्दा कधीही गांभीर्याने विचारात घेतला गेला नाही, म्हणूनच दोन्ही हातांनी खर्च करण्याची पवनाथडीची ‘उत्सवी परंपरा’ कायम आहे.

हजारोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या पवनाथडीत ‘हवशे-नवशे-गवशे’ सगळे झाडून सहभागी होतात. बचत गटांसाठी जवळपास ४०० दालने विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. एका दालनात दोन या प्रमाणे तब्बल ८०० महिला बचत गटांची व्यवस्था लावून दिली जाते. विविध प्रकारचे पाळणे, खेळणी तसेच मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम पवनाथडीत असतात. यामुळे खऱ्या अर्थाने ही जत्राच भरत असते. पवनाथडीचा हा भलताच थाट मूळ हेतूशी मात्र विसंगत आहे. पवनाथडीत सहभागी होणाऱ्या गटांपैकी असे किती बचत गट आहेत, ज्यांच्याकडून विक्रीयोग्य वस्तूंचे उत्पादन केले जाते. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे दालन अभावानेच दिसते. बाहेरून विकत आणलेल्या वस्तू चढय़ा दराने विकल्या जातात. जिकडेतिकडे खाद्यपदार्थाची रेलचेल असते. हे खाद्यपुराण जवळपास ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांमध्ये वस्तू खरेदी करणाऱ्यांपेक्षा विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे प्रमाण जास्त असते. ‘टाइमपास’ म्हणून पवनाथडीत बागडणाऱ्यांची संख्या कमी नाही.

शहरवासीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पवनाथडी’त हद्दीबाहेरचे व्यावसायिक तसेच बचत गटही घुसखोरी करतात आणि बक्कळ पैसे कमवून निघून जातात, हे उघड गुपित आहे. त्यांना नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची कृपादृष्टी लाभते, त्यामुळेच हे शक्य होते. काही प्रकरणांमध्ये ‘देणं-घेणं’ झाल्याशिवाय राहात नाही. अनेकदा समूह संघटकांची भूमिका संशयास्पद असते. खोटी बिले सादर होतात. या व अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी होतात. पुण्यासह बाहेरील अनेक बचत गट घुसखोरी करतात आणि शहरातील बचत गटांना जागा उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जाते. असे किती बचत गट आहेत, ज्यांनी काहीतरी उठावदार कामगिरी करून दाखवली आहे, असे शोधायचे म्हटले तर ठोसपणे सांगता येणार नाही.

पवनाथडी हा निश्चितपणे चांगला उपक्रम आहे, मात्र ज्या उदात्त हेतूने पवनाथडीचा उपक्रम राबवला जातो, तो सफल होताना दिसत नाही. मोठय़ा प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो. ठराविक लोकांची बिनबोभाट ‘दुकानदारी’ सुरू असते. किती बचत गटांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले, कोणी उद्योगाची उभारणी केली, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. पवनाथडीत ज्या ८०० महिला बचत गटांची व्यवस्था लावली जाते. त्यापैकी १० टक्के बचत गट दरवर्षी सक्षम झाले, तरी दहा वर्षांत सर्व बचत गटांना अपेक्षित लाभ मिळू शकतो. त्यानंतर इतर बचत गटांचे सक्षमीकरण टप्प्याटप्प्याने करता येऊ शकते, मात्र हे कागदी घोडे नाचवण्यासारखे होईल. प्रत्यक्षात तसे होईल का, याविषयी साशंकता आहे. त्यासाठी संयुक्तरीत्या प्रयत्न करायला हवेत आणि खऱ्या अर्थाने काम करणारे बचत गट भरडले जाऊ नयेत, याची खबरदारी घेतली पाहिजे.

स्थळवाद नेहमीचा; पुन्हा सांगवीच

सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैदान, पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीचे मैदान, भोसरीतील लांडगे नाटय़गृहाशेजारील मैदान या तीन ठिकाणी ‘पवनाथडी’ची जत्रा भरवण्यात येते. पवनाथडीचे ठिकाण काय असावे, यावरून दरवर्षी न चुकता वाद रंगतो. त्यापैकी ‘पिंपरी की सांगवी’ हा स्थळवाद नेहमीच रंगल्याची उदाहरणे आहेत. या वादातच गेल्या वर्षी भोसरीला संधी मिळाली. यंदा मात्र वाद रंगणार नाही, कारण सांगवीसाठी आग्रह धरणारे पालिकेचे ‘कारभारी’ बनले आहेत. यंदाची पवनाथडी जत्रा चार ते आठ जानेवारी २०१८ या कालावधीत सांगवीच्या मैदानातच होणार आहे. ‘उत्सवी उधळपट्टी’ची परंपरा कायम राखत त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे.

Story img Loader