महाविद्यालयात, उद्यानात, मुख्य रस्त्यावर साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे लोण आता थेट रुग्णालयात पोहोचले आहे. रूग्णांचा विचार न करता मित्राला सरप्राइज देण्यासाठी तब्बल ४० युवकांनी रूग्णालय परिसरात गोंधळ घालत वाढदिवस साजरा केला. ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडली. युवकांनी घातलेल्या गोंधळामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

वायसीएम रूग्णालयात एका महाविद्यालयीन युवकावर उपचार सुरू आहेत. त्याचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ४० ते ५० युवक चक्क रूग्णालयात पोहोचले. त्यांनी रूग्णालय परिसरात वाढदिवस साजरा केला. सुरूवातीला या सर्वांनी रूग्णालय परिसरात केक कापला, पिपाण्या वाजवत उच्छाद मांडला. त्यानंतर थेट रूग्णालयात घुसून आरडाओरड करत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सेलिब्रेशनमुळे रूग्ण भयभीत झाले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रूग्णालयाच्या सुरक्षा विभागाने त्वरीत पिंपरी पोलिसांना याची माहती दिली. पोलिसांनी २४ जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करत नंतर सर्वांना सोडून दिले.

Story img Loader