राज्यात सत्ता कधी स्थापन होणार हा एकच विषय ज्याच्यातोंडी चघळला जात आहे. पण, मुख्यमंत्री पदाच्या कोंडीत अडकलेला सत्तेचा गाडा पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा सत्ते बसण्याचा मान भाजपालाच मिळणार की अन्य कुणाला हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. मात्र, कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान भाजपाला मिळाला आहे.

राज्यातील सत्तेच्या खुर्चीचा घोळ सुरु असताना लाखो वैष्णवांचं श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठूरायाच्या महापूजेचा मान भाजपाच्या मंत्र्यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशी निमित्त होणारी शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. विधी व न्याय विभागाने याची माहिती एका पत्राद्वारे दिल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंरीद समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी ८ नोव्हेंबर रोजी आहे.

आणखी वाचा- शिवसेना-भाजपा यांच्यातील कोंडीमागे ‘ही’ चार खाती

विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर दुसरीकडे युतीच्या सरकारचा रथ चिखलात रूतला आहे. सेना मुख्यमंत्री पदासाठी आडून बसली आहे. निवडणुकीचा निकाल लागून जवळपास ११ दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच आहे. असे असताना विठूरायाची महापूजा कोण करणार याची उत्सुकता होती. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते. मात्र फडणवीस सरकारमध्ये आषाढीला मुख्यमंत्री फडणवीस, तर कार्तिकीला चंद्रकांत पाटील हे पूजा करीत होते.

या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विधी व न्याय विभागाने यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापुजे बाबत एका पत्राद्वारे कळवले आहे. कार्तिकी एकादशीची महापूजा ८ नोव्हेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ८ नोव्हेंबर म्हणजेच एकादशीला पहाटे २.३० वाजता विठ्ठलाची, तर ३ वाजता रुक्मिणीमातेची महापूजा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांना सहाव्यांदा या पूजेचा मान मिळत आहे.