पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या राहुल जाधव यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेसह अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला. तर शिवसेना तटस्थ राहिली. राहुल जाधव यांनी ११३ पैकी ८० मते मिळवत महापौरपद पटकवले. तर उपमहापौरपदी भाजपाचे सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यांना ७९ मते मिळाली.
तर राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यांना फक्त ३३ मते मिळाली. नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मतदान घेण्यात आले. या मतदाना ८० मते मिळवत राहुल जाधव यांनी महापौरपद मिळवले आहे. आज राहुल जाधव महात्मा फुले यांच्या वेशात तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंच्या वेशात आले होते.
१९९७ ते २००२ या कालावधीत राहुल जाधव रिक्षा चालवत असता. त्यानंतर २ वर्षे त्यांनी शेती केली. २००४ मध्ये त्यांचे लग्न झाले. राहुल जाधव त्यानंतर एका कंपनीत चालक म्हणून कामाला लागले. राज ठाकरेंनी जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हा राहुल जाधव यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१२ मद्ये राहुल जाधव पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर २०१७ मध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह ते भाजपात दाखल झाले. आता आज पिंपरीच्या महापौर पदाची माळ राहुल जाधव यांच्या गळ्यात पडली आहे.