कारकीर्दीवर आधारित लघुपटाचीही निर्मिती * नव्या पिढीला मार्गदर्शक..
पुणे : रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका अशा विविध माध्यमांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा प्रदीर्घ कलाप्रवास लवकरच शब्दरूपाने वाचकांसमोर येत आहे. कारकीर्दीचा वेध घेणाऱ्या लघुपटाची निर्मिती करून गोखले यांचा अभिनय आणि त्यांचे विचार भावी पिढय़ांतील कलाकारांसाठी जतन करण्यात येणार आहेत.
पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. गेली सात दशके मी काम करीत आहे. हा प्रवास आपल्या शब्दांमध्ये मांडावा या उद्देशातून मी लेखन करीत आहे.
करोना प्रादुर्भावामुळे चित्रीकरण आणि अन्य व्याप थांबले असल्याने हाताशी मिळालेल्या वेळेचा मी लेखन करण्यासाठी सदुपयोग करत आहे. लेखन म्हणजे माझे आत्मचरित्र नाही, तर केवळ माझ्या कला प्रवासाचा मीच वेध घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे गोखले यांनी सांगितले.
गोखले म्हणाले, माझ्या अभिनय कारकीर्दीमध्ये आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांना मी शब्दरूप देत आहे. या अनुभवांनी मला खूप काही शिकविले. माझ्या जडणघडणीमध्ये योगदान देणारे रणजित देसाई, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सुरेश खरे, शेखर ढवळीकर, विजया मेहता अशा मान्यवरांसह माझ्यासमवेत काम करणारे सहकलाकार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.
कलाकार म्हणून मी कसा घडत गेलो, वाचन आणि अभ्यासातून स्वत:ला कसा घडवत गेलो याचा पट मांडण्याचा हा प्रयत्न आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका असे स्वतंत्र विभाग असतील. वेब मालिका या नव्या माध्यमासह अध्यापन क्षेत्रात मी केलेल्या कामातून आलेले अनुभव सध्या मी लिहीत आहे.
केवळ शब्दरूपातच नाही तर माझ्या कारकीर्दीचे दृक-श्राव्य माध्यमाद्वारे जतन करण्याच्या उद्देशातून एका लघुपटाची निर्मिती करण्यात येत आहे. माझे मित्र विवेक वाघ या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. माझ्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त युवा पिढीच्या कलाकारांना मार्गदर्शक ठरेल अशी भेट देण्याचा मानस असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले.