पिंपरी पालिकेचा पाच वर्षांपासून रखडलेला पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्ग दोन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर, शुक्रवारी या मार्गावरील बससेवा सुरू करण्यात आली.
पिंपरी पालिकेच्या दापोडी ते निगडी या १२ किलोमीटरच्या बीआरटीचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. या मार्गावर सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने येथून वाहतूक सुरू झाल्यास अपघातांची शक्यता आहे, यासह विविध मुद्दय़ांवर आक्षेप घेत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अलीकडेच झालेल्या सुनावणीत या मार्गावर चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार, बीआरटी मार्गावर दोन वेळा चाचणी झाली. त्यानंतर, न्यायालयाने प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने बीआरटी सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यानुसार, शुक्रवारपासून ही बससेवा सुरू करण्यात आली. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार आदींनी बीआरटी मार्गावरील बसमधून प्रवास केला.