पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. कारवाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने थैमान घातले असून करोनाबाधितांचा आकडा हा २६ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात. करोना हा संसर्गजन्य असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आज सायंकाळी सहापर्यंत तब्बल ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अनेक नागरिक हे सार्वजनिक ठिकाणं जसे बँका, भाजी बाजार, किराणा, मेडिकल दुकानांमध्ये जाताना मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता पोलिसांनी कारवाई केल्याने किमान पोलिसांच्या कारवाईने तरी नागरिक मास्क वापरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader