धारदार शस्त्रांइतकेच घातक; पोलिसांपुढे मोठी डोकेदुखी

रस्त्यांवरील पदपथांसह शहरभरातील विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या ठोकळय़ांचा वापर आता थेट गुन्हय़ांसाठी होऊ लागला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये शहरात घडलेल्या खुनांच्या विविध घटनांमध्ये सिमेंटचे ठोकळे हत्यार म्हणून वापरले गेले आहेत. याशिवाय, दंगली, तोडफोड, रास्ता रोकोसह रस्त्यांवरील मारामारीतही त्याचाच वापर झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता धारदार शस्त्रांइतक्याच घातक असलेल्या व सहज उपलब्ध होत असलेल्या या ठोकळय़ांच्या स्वैर वापराला पायबंद कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने विविध ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्थापत्यविषयक कामांमध्ये हे सिमेंटचे ठोकळे वापरण्यात येतात. जिथे पालिकेचे काम सुरू आहे, अशा ठिकाणी हे सिमेंटचे ठोकळे आणून टाकले जातात. पालिकेचा कारभार हा बऱ्यापैकी संथ असल्याने बरेच दिवस हे ठोकळे तसेच पडून राहतात. त्यामुळे एकतर ते चोरीला जातात किंवा गुन्हय़ांमध्ये वापरले जातात. धारदार शस्त्रांइतकेच हे ठोकळे घातक ठरल्याचे दिसून आले आहे. िपपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये ठोकळय़ांच्या वापरातून घडलेल्या विविध गुन्हय़ांचे वास्तव चित्र पुढे आले आहे.

चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपावर एका गटाने प्रतिस्पर्धी गटातील तरुणाचा डोक्यात अशा ठोकळय़ांचा मारा करून खून केला होता. त्या पाठोपाठ, खराळवाडी येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा खून करताना याच सिमेंटच्या ठोकळय़ांचा वापर झाला होता. आकुर्डीत टोळीयुद्धातून एका तरुणाचा खून झाला, तेव्हाही हेच हत्यार म्हणून वापरण्यात आले. गांधीनगर येथे एका गुन्हेगाराच्या डोक्यात सिमेंटचे ठोकळे टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला. नुकत्याच झालेल्या दंगलीत वाहनांवर तसेच दुकानांवर झालेल्या दगडफेकीत तसेच रस्त्यावरील मारामारीतही रस्त्यावर पडलेले ठोकळेच वापरण्यात आल्याचे दिसून येते. पोलिसांकडूनही या माहितीस दुजोरा दिला जातो, मात्र त्यावरील उपाययोजना पालिकेकडून करण्यात यावी, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. यावर कशा प्रकारे प्रतिबंध घालावा, असा प्रश्न उपस्थित करतानाच यासाठी पालिका व पोलिसांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर व्यक्त होतो आहे.

प्रस्थापितांचे अर्थकारण व टक्केवारीचे गणित

पिंपरी पालिकेतील बरेचसे अर्थकारण या सिमेंटच्या ठोकळय़ांभोवती फिरते आहे. अनेक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या या ठोकळय़ांचा दर्जा कायम वादात राहिला आहे. आवश्यकता नसताना हे ठोकळे बसवण्यात येतात. चांगल्या स्थितीत असणारे ठोकळे अचानकपणे बदलण्यात येतात. जितक्या संख्येने बसवायचे आहेत, त्यापेक्षा अधिक संख्येने ते तयार केले जातात. शहरभरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर हे ठोकळे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून येतात. सिमेंटचे ठोकळे तयार करण्याच्या उद्योगांमध्ये शहरातील प्रस्थापित नेत्यांचे अर्थकारण असून अनेकांची टक्केवारीची गणिते अवलंबून आहेत. या पाश्र्वभूमीवर हे सिमेंटचे ठोकळे रस्तोरस्ती सहजपणे उपलब्ध होतात, मात्र त्याकडे कोणाचे लक्ष नसते. त्यामुळे त्यांचा गैरवापर होत असूनही त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

Story img Loader