काँग्रेसचे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप
पिंपरी पालिका ताब्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने वर्षभराच्या आतच भ्रष्ट कारभाराच्या सर्व सीमा ओलांडल्या असून सर्वत्र टक्केवारीचा सावळागोंधळ दिसून येत असल्याचे सांगत पालिका पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा आणि महापालिका बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उर्वरित चार वर्षे भाजपने अशाप्रकारे कारभार सुरू ठेवल्यास पालिकेची तिजोरी मोकळी होईल, अशी भीती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
भाजपकडे पिंपरी पालिकेचा कारभार आल्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने साठे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून पिंपरी पालिका बरखास्तीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. साठे म्हणाले, वर्षभरापूर्वी भाजपची सत्ता आली. कामाची दिशा ठरवण्यासाठी इतका काळ पुरेसा होता, त्यात भाजपने काय दिवे लावले, जनतेची व पालिकेची काय दशा झाली, ते संपूर्ण शहर पाहते आहे. विरोधकांनी आरोप करण्याची गरज नाही. भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण पेटले आहे. खासदारांसह अनेकांनी पालिकेच्या कारभाराविषयी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. भाजपची यंत्रणा यास कारणीभूत आहे. वास्तविक आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बरखास्तीची मागणी करून उपयोगही नाही. कारण, ते ‘क्लीन चिट’ देणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांना एक न्याय आणि त्यांना नको असणाऱ्यांना दुसरा न्याय असतो.
रस्तेविकासाचे ४२५ कोटींचे काम असो वाकडच्या सीमािभतीसारखे काम, संगनमताने पालिकेची लूट सुरू आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करणारा जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केला. प्रत्यक्षात एका वर्षांतच भाजपने राष्ट्रवादीला मागे टाकले आहे. पालिका मोकळी करण्याचा चंगच भाजप नेत्यांनी बांधला आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असल्याने भाजपला सत्तेची धुंदी आहे. पिंपरीत मूठभर लोकांच्या हातात कारभार असून त्यांनी कहर केला आहे. नागरिकांची दिशाभूल चालवली आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा व शास्तीकर रद्द करण्याचा शब्द भाजपने पाळला नाही. पाडापाडी करताना दुजाभाव केला जातो. विशालनगर येथे एका बेकायदेशीर दारूच्या दुकानास पाठबळ देण्यात येत असून सामान्यांची घरे पाडली जात असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. अशी मंडळी सत्तेत राहणे घातक आहे, ते पालिका मोकळी करतील, त्यामुळे पालिका बरखास्त करण्याची गरज असल्याचे साठे यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका संशयास्पद
पिंपरी पालिकेत काँग्रेसचा एकही लोकप्रतिनिधी नाही. पालिकेत सक्षम विरोधी पक्ष नाही, हे शहराचे दुर्दैव आहे. शिवसेनेची भूमिका संशयास्पद आहे. ते भाजपविरोधी बोलतात. मात्र, सत्तेतील वाटा त्यांना सोडवत नाही. पालिकेत चोऱ्या होतात म्हणून त्यांचा विरोध आहे की, त्या चोरीचा वाटा मिळत नाही, याविषयी त्यांचा आक्षेप आहे, अशी सूचक टिप्पणी सचिन साठे यांनी केली.