|| बाळासाहेब जवळकर

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यामुळे हतबल झालेली पोलीस यंत्रणा हा कळीचा मुद्दा बनला आहे. या परिस्थितीत कोणतीच सुधारणा होत नाही. मोकाट सुटलेल्या गुंडांकडून तोडफोडीच्या घटना घडल्या नाहीत असा शहरातील एकही भाग उरला नसेल. अल्पवयीन गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करायचा, हे पोलिसांपुढील आव्हान आहे. दुसरीकडे, शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचा ‘तू मारल्यासारखे कर, मी ओरडल्यासारखे करतो’ हा खेळ संगनमताने सुरूच आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील तोडफोडीच्या घटनांनी कहर केला आहे. चिंचवडच्या मोहननगर भागात गुरुवारी (१२ जुलै) मध्यरात्री आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी, पिंपळे निलख येथे त्याच पद्धतीची घटना घडली. गेल्या दोन वर्षांत शहराच्या विविध भागांत तोडफोडींच्या घटना घडल्या आहेत. शहरातील एकही भाग राहिला नसेल, जिथे तोडफोडीच्या घटना घडलेल्या नाहीत. हातात कोयते, धारदार शस्त्रे घेऊन गुंड प्रवृत्तीचे तरुण दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हा उद्योग करतात. दुचाकीवर कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरड करत फिरतात. रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करतात. यातील बहुतेक घटना सीसीटीव्हीत कैदही झाल्या आहेत. ते चित्रण भयानक असेच आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे, तलवारीने केक कापण्याच्या या वाढत्या घटनांमुळे पोलिसांना नव्या डोकेदुखीला सामोरे जावे लागते आहे.

अशा घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. पोलीस आरोपींना पकडतात. ते जामिनावर बाहेर येतात. पुन्हा तसेच गुन्हे करू पाहतात. तोडफोड करणारे बहुतांश आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळून येते. अशा अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करता येत नाही. मात्र, इतरांवर आम्ही कठोर कारवाई करतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही शहराच्या विविध भागांत अशा घटना सुरूच आहेत. त्या रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा, उपाय लागू पडत नसल्याने पोलीसही हतबल आहेत. एकीकडे, पोलीस आयुक्तालय सुरू होणार आणि शहरातील गुन्हेगारीला आळा बसणार, असा युक्तिवाद केला जातो. दुसरीकडे, गुन्हेगारांचा वाढता उच्छाद हा चिंतेचा विषय बनला असताना त्यावर नियंत्रण आणता येत नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. शहरातील बहुतांश राजकारणी गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालतात, हे लपून राहिलेले नाही. खाबूगिरीच्या नादात पोलीस अधिकाऱ्यांनाही कर्तव्याचा विसर पडतो, हे कटू सत्य आहे. त्यामुळे तोडफोडीचे उद्योग खरोखर थांबवायचे असतील तर राज्यकर्ते व पोलीस या दोघांनीही संयुक्तपणे प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा, पोलीस आयुक्तालय झाले तरी तोडफोडीच्या घटना थांबणार नाहीत आणि गुन्हेगारीचा आलेखही वाढताच राहील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

विद्यार्थ्यांनी मतदानाद्वारे निवडले वर्गप्रतिनिधी

पिंपरी महापालिकेच्या शाळांमध्ये फारसे चांगले काही घडत नाही, असाच सूर नेहमी आळवला जातो. मात्र, फुगेवाडीच्या टिळक शाळेतील निवडणुकीची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येच निवडणूक घेण्याचा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेत निवडणुकीची धामधूम सुरू होती. सहलमंत्री ते मुख्यमंत्री अशा आठ पदांसाठी निवडणूक होणार होती. त्यासाठी १६ उमेदवार होते आणि पाचवी ते सातवीतील १२९ विद्यार्थी त्यांना मतदान करणार होते. वर्गात येऊन विद्यार्थ्यांनी केलेला प्रचार ते खऱ्याखुऱ्या निवडणुकांप्रमाणे मतपत्रिकांवर शिक्के मारून झालेले मतदान आणि निकालाची उत्कंठा या सर्व घडामोडींमुळे शाळेतील वातावरण निवडणूकमय झाले होते. सहलमंत्री, शिस्तमंत्री, स्वच्छतामंत्री, क्रीडामंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या आठ पदांसाठी झालेल्या मतदानात १२९ पैकी १०४ जणांनी मतदान केले. दोन मते बाद ठरली. तर, एक मतपत्रिका कोरी होती.

मतमोजणी झाल्यानंतर, सोनल चौधरी, स्नेहल भोसले, दिव्या बोर्गे, कुणाल जाधव, ओंकार निकम, वैभव साखरे, अमन काखंडगी, दिनेश जाधव हे उमेदवार विजयी ठरले, तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी जल्लोष केला. मुलांना भविष्यात मतदान करावयाचे आहे. त्याची सविस्तर माहिती होण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापिका नसीम मोमीन यांनी सांगितले.

राष्ट्रवादी-भाजपचे संगनमत

राष्ट्रवादीच्या पिंपरीतील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रत्यक्षात, शहराच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादीत काहीही फरक नाही, हे उघड गुपित आहे. पिंपरी महापालिकेत पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे उद्योग केले, तेच उद्योग भाजप नेत्यांनी सध्या सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दमादमानं खाण्याची कला होती. ते भाजप नेत्यांना जमत नाही. वरकरणी दोन्ही पक्ष काहीही दाखवत असले तरी त्यांच्या नेत्यांचे संगनमत आहे. महापालिकेतील धंद्याच्या अनेक गोष्टींत त्यांची युती स्पष्टपणे दिसून येते. राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या वाढदिवशी त्याच्या घरी जाऊन भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या, हे ताजे उदाहरण आहे. राष्ट्रवादीचा हा नेता अजूनही महापालिकेतील अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आहे. भाजपचे पदाधिकारी त्यांच्याकडून धडे घेतात. अशा परिस्थितीत, राष्ट्रवादीने भाजपवर आरोप करणे, भाजपने प्रत्युत्तरादाखल नवे आरोप करणे हा खेळ म्हणजे ‘तू मारल्यासारखे कर, मी ओरडल्यासारखे करतो’ या प्रकारातील असल्याचे मानले जाते.

Story img Loader