पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगार मोकाट; पोलीस हतबल

पिंपरी : उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून प्रयत्न करूनही पोलिसांना त्यामध्ये यश येताना दिसत नाही. पोलिसांनाच धमकावणे तसेच त्यांच्यावर हात उगारण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणे वातावरण आहे. सत्ताधारी नेते असो की इतर पक्षातील प्रमुख राजकारणी, त्यांना काहीही सोयरसुतक नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात चाललयं तरी काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

वाहनांच्या तोडफोडीच्या गुन्ह्य़ांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मंगळवारी दुपारी खराळवाडी-गांधीनगर येथील गणेश मंदिरासमोर लावण्यात आलेली एका वकिलाची मोटार अज्ञातांनी फोडली. काही दिवसांपूर्वी खराळवाडी येथे अल्पवयीन मुलांचा समावेश असणाऱ्या ४० ते ५० जणांच्या टोळक्याने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. यासारख्या काही दिवसांमधील इतर घटना पाहता शहरातील गुन्ह्य़ांची संख्या कमालीची वाढली असल्याचे प्रकर्षांने दिसून येते. दोन मे च्या रात्री देहूरोड येथे धूडगूस घालत एका टोळक्याने सात वाहनांची तोडफोड केली. तीन मे रोजी निगडीत यमुनानगर येथे दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी विम्याचे २२ लाख रुपये पळवून नेले. पिंपरीत पत्नीशी झालेल्या वादानंतर चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यावर फेकण्याची घटना घडली. पिंपरीत साबणाच्या व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला.

पीएमपीच्या वाहकाला बेदम मारहाण

पीएमपीच्या वाहकाला बेदम मारहाण झाल्याची घटना निगडीतील भक्ती-शक्ती चौकात घडली. वाहकाने फिर्याद दिली असून या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवाज्यात उभे राहू नका, असे वाहकाने प्रवाशाला सांगितले. त्यावरून राग अनावर झालेल्या त्या प्रवाशाने दूरध्वनी करून सहकाऱ्यांना बोलावून घेतले. निगडीत शेवटच्या थांब्यावर बस येताच वाहकास चारजणांनी मिळून मारहाण केली. आरोपींची ओळख पटली नसल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader