जाचक अटींमुळे पुढाकार नाही

पिंपरी : करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, पोलिसांच्या जाचक अटींमुळे चाकण परिसरातील बहुतांश उद्योग मंगळवारी सुरू झाले नाहीत. जाचक अटींमुळे लघु उद्योजकांनी उद्योग सुरू केले नाहीत. मात्र, चाकण परिसरातील बजाज, महिंद्रा तसेच इतर मोठय़ा उद्योगांनी उत्पादनाची तयारी सुरू केली आहे.

चाकण, म्हाळुंगे या परिसरातील ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या कंपन्यांना उत्पादन सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. अटी-शर्तीवर परवानगी दिल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांबरोबर बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना उद्योजकांना दिल्या. या बैठकीला पोलीस उपायुक्त सुधीर हिरमेठ, स्मिता पाटील, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिज, इतर असोसिएशन, बजाज, महिंद्रा, व्होक्सव्ॉगन, मिंडा आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी घातलेल्या अटी-शर्ती जाचक असल्यामुळे काही लघु उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यास असमर्थता दर्शविली.

उद्योग सुरू करताना उद्योजकांनी कामगारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करावी, प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना कंपनीमध्ये प्रवेश देऊ नये, कामावर येताना कामगारांना दुचाकीवर येऊ देऊ नये, कंपनीचे उत्पादन सुरू असताना कंपनी रोज निर्जंतुक करावी, अशा अटी पोलिसांनी उद्योजकांना घातल्या आहेत. चाकण परिसरामध्ये लघु उद्योगांमध्ये किमान पाच आणि त्यापेक्षा अधिक कामगार आहेत.

त्यामुळे कमी कामगार

असलेल्या लघु उद्योगांना कामगारांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करणे परवडणारे नाही. कंपन्यांमधील निर्णय घेणारे अधिकारी पुण्यामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र बस सुविधा देणे उद्योजकांना परवडणारे नाही, असे सांगण्यात आले.

उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवागी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर िपपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर उद्योजकांची बैठक झाली. पोलीस प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटी-शर्तीमुळे फक्त तीस टक्के उद्योजकांनी आपली उत्पादने सुरू केली आहेत. इतर उद्योजक मात्र, अजूनही संभ्रमावस्थेत आहेत.

 – दिलीप भटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिज, चाकण