मागील काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनायलयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी जवळपास २०० कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र त्या पैशातून कोणत्याही प्रकाराच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी सुळे यांनी सोमवारी सकाळी (२८ जून २०२१ रोजी) केली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील कचरा डेपो कित्येक वर्षापासून येत आहे. इथे येणार्‍या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. मात्र सध्या कचरा डेपोतील परिस्थिती लक्षात घेता, कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर वेळोवेळी कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. मग हा निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

“जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांच्याकडे देखील मी या चौकशीसंदर्भात मागणी करणार आहे की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दादा यातून निश्चित मार्ग काढेल,” असा विश्वास देखील सुळे यांनी व्यक्त केला.