पुण्यात जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उस्मानीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आज स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन तास उस्मानीचा जबाब नोंदविण्याचं काम सुरु होतं, अशी माहिती स्वारगेट पोलिसा मार्फत देण्यात आली आहे. याचसंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानीने वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार १५३ अ कलमाअंतर्गत उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानीवर कारवाई करण्यात यावी यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाल्याचंही पहायला मिळालं. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना उस्मानीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. माझ्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा असं उस्मानीने याचिकेमध्ये म्हटलं होतं. पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच उस्मानी याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार मागील आठवड्यात ८ मार्च रोजी शरजील उस्मानी हा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून जबाब नोंदवून गेला होता. मात्र आणखी काही माहिती हवी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आज पुन्हा स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये शरजील उस्मानी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला. पोलिसांनी जवळपास तीन तास त्याची चौकशी केली. त्यानंतर उस्मानी पोलीस स्थानकामधून बाहेर पडला.
यासंदर्भात बोलताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी, “एल्गार परिषद प्रकरणी शरजील उस्मानी आज आला होता. त्याचा जबाब यापूर्वी आणि आज असा दोन वेळा नोंदविण्यात आला आहे. आज जवळपास तीन तास तो पोलीस स्टेशनमध्ये होता आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही. या जबाब अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे,” अशी माहिती दिली.