तांदळाऐवजी फुलांचा वापर, फटाक्यांना फाटा, ५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी पालिकेतील एका सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नात पर्यावरणरक्षणाचा संदेश देतानाच प्लास्टिक बंदी, स्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. लग्नात अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांचा वापर, फटाके न वाजवता अंधांना मदत, पर्यावरणाशी संबंधित जागृती करणारे फलक तसेच लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ५०० कापडी पिशव्यांचे वाटप या वेळी करण्यात आले. हे लग्न पंचक्रोशीत कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरले आहे.

मोशीत राहणारे अनिल घाडगे हे पालिकेत सुरक्षा कर्मचारी असून इंद्रायणी सेवा संघ या संस्थेमार्फत ते पर्यावरण क्षेत्रातही काम करतात. २२ एप्रिलला त्यांच्या धनंजय या मुलाचे खेडच्या टाकळकर परिवारातील शीतल हिच्याशी लग्न होते. दोघेही चांगले शिक्षित आहेत. लग्नात पैशाची उधळपट्टी टाळून विधायक व जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा निर्णय दोन्ही परिवाराने घेतला. त्यानुसार, लग्नात तांदळाचा अपव्यय टाळण्यासाठी अक्षता म्हणून फुलांचा पर्याय निवडण्यात आला. प्रवेशद्वारापासून आतपर्यंत सर्वत्र जनजागृती करणारे फलक लावण्यात आले. स्वच्छता पाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपल्या सुंदर पृथ्वीचे रक्षण करा, झाडांना पाणी घाला, पाण्याचा वापर काटकसरीने करा, आवश्यकतेनुसार विजेचा वापर करा, जवळच जायचे असल्याचे वाहनांचा वापर टाळा, ओला व सुका कचरा वेगळा करा, प्लास्टिकचा वापर करू नका, नदीपात्रात कचरा टाकू नका, थर्माकोलचा वापर टाळा, अशा विविध प्रकारचे फलक मंडपात ठळकपणे लावण्यात आले होते.

लग्नासाठी आलेल्या जवळपास ५०० पाहुणे मंडळींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. लग्नात फटाक्यांचा वापर न करता ते पैसे अंध कुटुंबीयांना मदत म्हणून देण्यात आले.

संपूर्ण लग्नात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला. ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. अन्नाची नासाडी नको म्हणून अक्षतांसाठी फुलांचा वापर केला.

अनिल घाडगे, सुरक्षा कर्मचारी

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. त्या दृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे. लग्नात अनावश्यक खर्च टाळला पाहिजे.

धनंजय घाडगे, वर

प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे, हा हेतू ठेवून जनजागृतीचे काम केले. त्याचे अनुकरण इतरांनी करावे.

शीतल टाकळकर, वधू

Story img Loader