पिंपरी-चिंचवडमध्ये करोनामुक्त व्यक्तींचे स्वागत करणे माजी महापौरांसह चार जणांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्स आणि त्यांच्या पतीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघांचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. पिंपरी-चिंचवडमध्ये राहात असलेल्या परिसरात ढोल, ताशे आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मात्र, तेव्हा अनेक नागरिक हे पाहण्यासाठी जमा झाले होते.
माजी महापौर आणि नगरसेविका मंगला कदम, अमेय सुधीर नेरूरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटने प्रकरणी गोविंद मधुकर गुरव वय-५८, (पोलीस कर्मचारी) यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे,
पुण्यात उपचार घेत असलेल्या नर्स आणि त्यांच्या पतीला गुरुवारी दुपारी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवडमध्ये राहात असलेल्या संभाजी नगर येथे आले. तेव्हा, नगरसेविका आणि माजी महापौर मंगला कदम यांनी त्यांच्या काही व्यक्तींना सोबत घेऊन संबंधित करोनामुक्त व्यक्तींच ढोल, ताशे आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. परंतु, हे सर्व सुरू असताना अनेक नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाचे उलनघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.