|| चिन्मय पाटणकर
टीआयएफआर आणि आयसरच्या संशोधकांचे संशोधन :- अन्न सेवन व उपवासाच्या स्थितीमध्ये रक्तातील मेद पातळी नियंत्रित करणाऱ्या मूलभूत यंत्रणेचा पहिल्यांदा अभ्यास करण्यात संशोधकांना यश आले आहे. हृदयविकारासारख्या आजारांवरील उपचारासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकेल.
टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) यांच्या संयुक्त संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. हे संशोधन ‘जर्नल सेल बायोलॉजी’ या संशोधन पत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले. संशोधकांमध्ये मुकेश कुमार, श्रीकांत ओझा, प्रियंका राय, औमी जोशी, डॉ. सिद्धेश कामत, रूप मलिक यांचा सहभाग होता.
मानवी शरीरातील वितंचकांची (एन्झाइम) नेमकी भूमिका पुरेशी उलगडलेली नसल्याने त्यांचे उपयोग शोधून काढण्यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. अन्न सेवनातून ग्लुकोज शर्करेतून ऊर्जा मिळत असल्याने मेद (फॅट्स) वापरले जात नाही. तर उपवासावेळी आहारातून ग्लुकोज मिळत नसल्याने शरीर मेद जाळण्यास सुरुवात करते. यात राखीव मेदही यकृतात व नंतर रक्तात पाठवले जाते. पण ट्रायग्लिसराईडच्या स्वरूपातील मेद रक्तात सोडताना त्याचे प्रमाण उपवासाच्या स्थितीत जास्त होईल असे वाटले, तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. कारण त्यांचा रक्तात सोडला जाण्याचा वेग यकृताकडून नियंत्रित केला जात असल्याने रक्तातील मेद पातळी वाढण्याचा धोका निर्माण होत नाही. या प्रक्रियेत ट्रायग्लिसराईड संपृक्त मेद कण हेपॅटोसाइट्सकडे जाऊन लिपोप्रोटिन कण तयार होतात.
उपवासाच्या काळात मेदाम्ले यकृतात साठतात. नेहमीप्रमाणे अन्न सेवन करताना रक्तात ट्रायग्लिसराईडचे प्रमाण हे इन्शुलिनच्या माध्यमातून नियंत्रित होते. कारण जेव्हा मेदकण वाढतात, तेव्हा फॉसफॅटिडिक अॅसिड वाढून किनसेन मोटर्स सक्रिय होते. त्यातून मेदकण हेपेटोसाइटच्या आतील परिघावर जमून त्यापासून कॅटॅबोलायझेशनने लिपोप्रोटिनची निर्मिती केली जाते. उपवासाच्या अवस्थेत इन्शुलिन कमी होत असताना ही प्रक्रिया होमिओस्टॅटिक पद्धतीने होते. त्यातून घातक ट्रायग्लिसराईडची पातळी रक्ताला घातक पातळीपर्यंत वाढू दिली जात नाही. यातून असेही दिसून आले, की काही विशिष्ट पेप्टाइड हे ट्रायग्लिसराईडला रोखते. त्यातून पेशींवर घातक परिणाम होण्याचे टाळले जाते.
वेगवेगळ्या चयापचय अवस्थेत मेदाचे रक्तातील प्रमाण नैसर्गिक पद्धतीने सुरक्षित पातळीपर्यंत राखले जाण्याची व्यवस्था शरीरात आहे. या पद्धतीला लिपिड होमिओस्टॅसिस म्हणतात. यातून हायपरलिपीडमिया म्हणजे रक्तातील चरबी धोकादायक पातळीपर्यंत वाढण्यापासून शरीराचे रक्षण करणारे औषध तयार करता येईल. रक्तातील ट्रायग्लिसराईड आणि इतर मेद वाढल्याने हृदयविकार होतो. त्यामुळे शरीरातील नैसर्गिक मेद नियंत्रण पद्धतीची नक्कल करून औषध तयार करता येईल.
रक्तातील मेद पातळी नियंत्रित करणाऱ्या मूलभूत यंत्रणेचा पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनाचा हृदयविकारावर नियंत्रण ठेवू शकणारे औषध तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकेल. त्यासाठी आणखी सखोल संशोधन करण्याची गरज आहे . – डॉ. सिद्धेश कामत, संशोधक, आयसर