राजकारण्यांच्या बुडवेगिरीने व्यावसायिक त्रस्त

कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ मिरवून घेण्यासाठी फ्लेक्सद्वारे केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीचा आधार राजकारणी मंडळी हमखास घेतात. मात्र, ज्यांच्याकडून फ्लेक्स तयार करून घेतले जातात, त्यांचे कामाचे पैसे बुडवण्याचे उद्योग अनेक राजकारणी व त्यांच्या बगलबच्च्यांनी केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशा बुडवेगिरीमुळे त्रस्त झालेले फ्लेक्स व्यावसायिक एकत्र आले आहेत. त्यांच्याकडील माहिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. धुळ्यात एका व्यावसायिकाने पैसे वसूल करण्यासाठी केलेला असा प्रयोग भलताच यशस्वी ठरल्याने तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरीतील पैसे बुडव्यांची माहिती जाहीर करण्याची मानसिकता येथील व्यावसायिकांची झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० हून अधिक फ्लेक्स व्यावसायिक आहेत, यातील अनेकांना पैसे बुडवण्यात आल्याचे कटू अनुभव आलेले आहेत. मुळात नफा कमी आणि स्पर्धा जास्त असलेल्या या व्यवसायातील बुडवेगिरी मारक ठरत असल्याने सारे जण हैराण झाले आहेत. वाढदिवस, अभीष्टचिंतन, आभार, निवड-नियुक्तीच्या शुभेच्छा, जयंती-महोत्सव अशा विविध कारणांसाठी फ्लेक्स लावले जातात. मात्र, यासंदर्भातील जाहिराती तयार करून घेण्यासाठी जी घाई केली जाते, तितकी तत्परता त्या व्यावसायिकाच्या कामाचे बिल देण्यासाठी दाखवली जात नाही. काम झाल्यानंतर महिनाभरात बिल मिळणे अपेक्षित असते, मात्र ती मुदत पाळलीच जात नाही. महिना, सहा महिने, वर्ष लोटले तरी बिल मिळत नाही. पाठपुराव्यासाठी दूरध्वनी केल्यास टाळाटाळ केली जाते. कधी चिडचिड केली जाते. वेळप्रसंगी दमदाटीही केली जाते, असे हमखास येणारे अनुभवही या मंडळींकडे आहेत. केवळ पिंपरी-चिंचवडला ही परिस्थिती आहे, असे नाही. तर, पुण्या-मुंबईसह राज्यभरात थोडय़ाफार फरकाने अशीच बुडवेगिरी सुरू असल्याची भावना या व्यावसायिकांनी व्यक्त केली.

पालिकेला मोठय़ा प्रमाणात खड्डय़ात घालणारा एक जाहिरात ठेकेदार आहे, त्याने सुरुवातीच्या काळात बहुतांश फ्लेक्स व्यावसायिकांना चुना लावला आहे. त्याने अनेकांकडून कामे करून घेतली, मात्र, त्यांचे पैसे दिलेच नाहीत. काही सन्माननीय अपवाद वगळता अनेकांच्या बाबतीत आलेले असे अनुभव भयंकर असल्याचे सांगण्यात आले. असे फ्लेक्स व्यावसायिक पिंपरीत एकत्र आले. एकाला बुडवून दुसऱ्याकडून काम करून घेतले जाते, त्यामुळे प्रत्येकाचे नुकसान होत असल्याचा प्रकार लक्षात आल्याने, पैसे न देणाऱ्याचे काम कोणीच करायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळणार नसतील तर त्यांची समाजमाध्यमांवर यादी प्रसिद्ध करण्याची मानसिकता या व्यावसायिकांची झाली आहे. धुळ्यात एकाने फ्लेक्स व्यावसायिकाचे पैसे बुडवले होते, दूरध्वनीला प्रतिसाद न देणाऱ्या त्या कथित नेत्याला पैसे देण्याचे जाहीर आवाहन करणारे खुले पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले.

Story img Loader