गौरी विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवात गर्दी सुरू होते. शहराच्या मध्यभागातील देखावे पाहण्यासाठी शनिवार (७ सप्टेंबर) आणि रविवारी (८ सप्टेंबर ) गर्दी उसळणार असून उत्सवातील पुढील पाच दिवस गर्दीचे राहणार आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बेलबाग चौकात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी लोखंडी कठडे बसविण्यात आले आहेत. तसेच गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गौरी विसर्जन तसेच सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मंडई, बेलबाग तसेच शहराच्या मध्य भागात वेगवेगळय़ा ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी उसळते. शनिवारी सायंकाळपासून मध्यभागात गर्दी होण्याची शक्यता आहे. मंडई, बेलबाग चौक परिसरात गस्त घालण्यासाठी विश्रामबाग, फरासखाना तसेच गुन्हे शाखेचे साध्या वेशातील पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

या भागातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. गर्दीच्या रेटय़ात चोरटे सावज हेरतात. त्याच्याभोवती कोंडाळे करून ऐवज किंवा मोबाइल संच लांबवतात. त्यामुळे गर्दीतून जाणाऱ्या नागरिकांनी विशेषत: महिलांनी सजग राहण्याची गरज असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घातपात विरोधी तपासणी मोहीम राबविण्यात आली.

काय काळजी घ्याल..

गौरी विसर्जनानंतर मध्य भागात गर्दी उसळते. या भागात चोरटय़ांची टोळी सक्रिय असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी. महिलांनी गर्दीत जाताना शक्यतो मौल्यवान दागिने घालू नयेत. दागिने घातल्यास सतर्क राहावे. लहान मुले तसेच पर्सकडे लक्ष ठेवावे. शक्यतो, वरच्या खिशात मोबाइल संच ठेवू नये. बेवारस वस्तूंना हात लावू नये. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मध्यभागातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे पोलिस दलात दाखल झालेल्या ‘स्पॉटर किट ’ यंत्रणेचा वापर यंदाच्या बंदोबस्तात केला जाणार आहे.– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

Story img Loader