टाळेबंदीच्या कालावधीत महावितरणची ग्राहकांसाठी नवी सुविधा
पुणे : टाळेबंदीच्या कालावधीत वीजग्राहकांना घरबसल्या मोबाइल मिस्ड कॉलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. महावितरणने जाहीर केलेल्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाइलच्या माध्यमातून मिस्ड कॉल दिल्यास तक्रारीची नोंद केली जाईल आणि त्याबाबतचा ‘एसएमएस’ही ग्राहकांना पाठविला जाईल.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना घरबसल्या तक्रार नोंदविता यावी, या दृष्टीने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशांनुसार ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी ग्राहकाला महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइलचा वापर करावा लागणार आहे. अशा नोंदणीकृत मोबाइलच्या माध्यमातून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मोबाइलवरून आलेल्या मिस्ड कॉलच्या आधारे संगणकप्रणालीद्वारे संबंधित ग्राहकाचा शोध घेतला जाईल. त्याचप्रमाणे एसएमएसच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला तक्रार मिळाल्याची पोहोच दिली जाईल. एकापेक्षा अधिक ग्राहकांसाठी एकाच मोबाइल क्रमांकाची नोंदणी असल्यास पहिल्या क्रमांकाच्या तक्रारीची नोंद केली जाईल.
मिस्ड कॉल किंवा इतर सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महावितरणकडे ग्राहकाच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. मोबाइलची नोंदणी न केलेल्या ग्राहकांनी नोंदणी करायच्या मोबाइल क्रमांकावरून टफएॅ हा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर संबंधिताच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी पुढील २४ तासांमध्ये महावितरणकडे केली जाईल. मिस्ड कॉल वा ‘एसएमएस’ या दोन्ही नव्या सुविधांसह महावितरणची http://www.mahadiscom.in वेबसाइट, मोबाइल अॅप तसेच कॉल सेंटरच्या १८००१०२३४३५ वा १८००२३३३४३५ / १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल.
‘एसएमएस’च्या माध्यमातून तक्रारीसाठी
‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक नाही. कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र त्यासाठी १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून ठडढडहएफ हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र, ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नसल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.